‘आकाडी’च्या मैदानात विधानसभेच्या बैठका

By admin | Published: July 17, 2014 11:36 PM2014-07-17T23:36:25+5:302014-07-17T23:41:23+5:30

खानापूर विधानसभा : इच्छुकांची मोर्चेबांधणी

Assembly meetings in 'Akadi' field | ‘आकाडी’च्या मैदानात विधानसभेच्या बैठका

‘आकाडी’च्या मैदानात विधानसभेच्या बैठका

Next

दिलीप मोहिते - विटा
खानापूर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचा धुरळा पावसाने झालेल्या चिखलातही उडू लागला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, ‘आकाडी’निमित्त आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या मैदानात कॉँग्रेस, राष्ट्रवादी, महायुतीसह अपक्षांनीही फिल्डिंग लावत विधानसभेच्या बैठका पार पाडल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात विधानसभेची रंगीत तालीम सुरू झाली आहे.
सध्या आषाढ महिना सुरू झाला असून, विटा शहरासह खानापूर मतदारसंघातील ग्रामीण भागात ‘आकाडी’च्या पार्ट्या रंगू लागल्या आहेत. पंचायत समिती गणनिहाय आकाडीच्या स्नेहभोजनाचे आयोजन करण्याचा धडाका सुरू झाला आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी, महायुती, मनसेसह अन्य अपक्ष इच्छुकांनीही आकाडीला महत्त्व देत मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. खानापूर तालुक्यातील करंजे, खानापूर, लेंगरे, गार्डी, भाळवणी, आळसंद यासह अन्य पंचायत समिती गणनिहाय आकाडी यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.
या आकाडी यात्रेत मतदारसंघातील सर्वच राजकीय पक्षाच्या विधानसभा इच्छुकांनी हजेरी लावत मतदारांच्या बैठका घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व तयारीच्या बैठकासाठी ‘आकाडी’ इच्छुकांना वरदान ठरू लागली आहे. पंचायत समिती गणातील मोठ्या गावात ‘आकाडी’चे आयोजन करून परिसरात असणाऱ्या गावातील मतदारांना ‘आकाडी’चे निमंत्रण देऊन विधानसभा निवडणुकीची बैठक घेतली जाते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील संभाव्य स्थितीवर सविस्तर चर्चा करून आगामी व्यूहरचनाही ठरविली जात आहे. त्यात आकाडी भोजनाच्या निमित्तााने आलेल्या लोकांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत लोकांच्या अडी-अडचणी व नाराजीचा अंदाजही इच्छुकांना येत आहे. त्यामुळे ‘आकाडी’ ही इच्छुकांना पर्वणीच ठरत आहे. परिणामी, विधानसभा निवडणुकीपूर्वी थेट मतदारांशी संपर्क होऊ लागल्याने कॉँग्रेस, राष्ट्रवादी, महायुतीसह मनसे व अन्य इच्छुकांना जनतेशी थेट संवाद साधता येऊ लागला आहे.
त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात पंचायत समिती गण नहाय ‘आकाडी’चे आयोजन होऊ लागले असून, या ‘आकाडी’च्या मैदानात विधानसभा निवडणुकीच्या बैठका होऊ लागल्या आहेत. त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनाही ‘आकाडी’चा चांगलाच आधार मिळाला आहे.

खानापूर विधानसभा मतदारसंघात आषाढ महिन्यात ‘आकाडी’ने चांगलाच वेग घेतला आहे. आकाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या इच्छुकांचा मतदार व कार्यकर्त्यांशी थेट संपर्क होऊ लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील पंचायत समिती गणनिहाय आकाडीचे आयोजन केले जात आहे.

Web Title: Assembly meetings in 'Akadi' field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.