इस्लामपूर-शिराळ्यात उमेदवारांची चाचपणी : विधानसभा निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:54 PM2018-10-06T23:54:40+5:302018-10-06T23:57:26+5:30
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये उमेदवारीवरून खलबते सुरू आहेत. युती झाल्यास इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागणार आहे, तर शिराळा मतदारसंघात भाजपचेच आमदार
अशोक पाटील ।
इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये उमेदवारीवरून खलबते सुरू आहेत. युती झाल्यास इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागणार आहे, तर शिराळा मतदारसंघात भाजपचेच आमदार असल्याने, ही जागा भाजपलाच मिळणार आहे. परंतु दोन्ही मतदारसंघात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
इस्लामपूर मतदारसंघात यापूर्वी अशोकदादा पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, विक्रम पाटील, विजय कुंभार यांनी भाजपचे अस्तित्व कायम ठेवले होते. युती शासनाच्या काळात अण्णासाहेब डांगे यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद होते. तरीही त्यावेळी भाजपला अच्छे दिन आले नव्हते. आता शेतकऱ्यांचे नेते सदाभाऊ खोत यांना कृषी राज्यमंत्रिपद मिळाले असून, त्यांच्या ताकदीचा अंदाज लावला जात आहे. राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात भाजपने फिल्डिंग लावली आहे. खोत यांच्यारूपाने भाजपला ताकद मिळाली आहे.
परंतु त्यांनी अद्यापही भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केलेला नाही. येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि आष्ट्याचे वैभव शिंदे या राष्ट्रवादीतून आयात केलेल्या नेत्यांवर भिस्त ठेवावी लागत आहे. मात्र केवळ त्यांच्या ताकदीवर राष्ट्रवादीला टक्कर देणे सोपे नाही. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी इस्लामपूर पालिकेत स्वत:च्या ताकदीवर पाच उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे येथील उमेदवारी शिवसेनेला मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. राष्टवादी वगळता इतर पक्षांशी जवळीक असलेल्या राहुल महाडिक यांनीही निवडणुकीसाठी मतदारसंघातील संपर्क वाढवला आहे.
शिराळा मतदारसंघात शिवाजीराव नाईक भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला जाणार असल्याचे निश्चित आहे. मात्र येथे महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक यांनीही दावा केला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केल्याने येथे मोठी चुरस आहे.
आगामी विधानसभेला शिवसेना व भाजपची युती झाल्यास शिराळा, सांगली, मिरज, जत हे चार मतदारसंघ भाजपसाठी राखीव आहेत, तर शिवसेनेसाठी इस्लामपूर, खानापूर, जत, कडेगाव हे मतदारसंघ राखीव आहेत. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेलाच मिळणार आहे. आघाडी न झाल्यास सर्वच मतदारसंघात शिवसेना उमेदवार देणार आहे.
- आनंदराव पवार,
जिल्हाप्रमुख, शिवसेना.