आष्ट्यातील चोरट्याकडून सव्वादोन लाखाचा मुद्देमाल जप्त
By घनशाम नवाथे | Published: June 29, 2024 11:11 PM2024-06-29T23:11:19+5:302024-06-29T23:13:59+5:30
त्याबाबत चौकशी केल्यानंतर सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.
घनशाम नवाथे, सांगली : सुरूल (ता. वाळवा) येथे घरफोडी केलेल्या संशयित राहुल प्रकाश माने (वय ३०, मूळ रा. इस्लामपूर, सध्या रा. दत्तवसाहत, आष्टा) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, रोकड, साड्या आणि दुचाकी असा सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक इस्लामपूर परिसरात पेट्रोलिंग करत होते. तेव्हा संशयित राहुल माने हा चोरीचा माल विक्री करण्यासाठी पेठनाका येथील पुलाखाली येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार परिसरात सापळा रचला. तेवढ्यात दुचाकीवरून संशयित राहुल माने तेथे आला. पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर सोन्याची अंगठी, रोख सात हजार रूपये, १५ हजार रुपयांच्या साड्या असा मुद्देमाल मिळाला. त्याबाबत चौकशी केल्यानंतर सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.
कसून चौकशी केल्यानंतर काही दिवसांपूर्वी सुरूल गावात भरदिवसा घरफोडी केल्याची कबुली त्याने दिली. त्याला मुद्देमालासह इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. राहुल माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याने जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलिस ठाणे हद्दीत चोरी, घरफोडीचे गुन्हे केलेले आहेत.
सहायक निरीक्षक पंकज पवार, सहायक फौजदार अनिल ऐनापुरे, अंमलदार सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरूण पाटील, सूरज थोरात, विनायक सुतार, रोहन घस्ते, अभिजित ठाणेकर, सुनील जाधव, श्रीधर बागडी, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.