भोंग्याच्या गदारोळात न पडता गांधींची मूल्ये आत्मसात करा - तुषार गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 05:11 PM2022-05-19T17:11:06+5:302022-05-19T18:29:28+5:30
आजचे शिक्षण लोकांना गुलाम बनविणारे आहे. मनाला उत्साह आणि ऊर्जा देणारे, एकमेकांवर प्रेम करायला शिकविणारे, वैज्ञानिक जाणिवा निर्माण करणारे आणि हातांना रोजगार देणारे शिक्षण असायला हवे.
इस्लामपूर : भोंगा आणि हनुमान चालिसाच्या गदारोळात माणसांची बुद्धी खुंटीत केली जात आहे. माणसांना भ्रमित करून समाजाच्या मानसिकतेचा राजकारणासाठी वापर केला जात आहे. अशावेळी प्रत्येकाने गांधी नावाचं मूल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत तुषार गांधी यांनी केले.
येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात हीरकमहोत्सवी वर्षातील पारितोषिक वितरण गांधी यांच्या हस्ते झाले. ॲड. एन.आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी महाविद्यालयातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला.
गांधी म्हणाले, शिक्षण ही समाजाची नैतिक जबाबदारी असल्याची गोष्ट आपण विसरत चाललो आहोत. त्यामुळे शिक्षणाचा स्तर दिवसेंदिवस घसरत निघाला आहे. आजचे शिक्षण लोकांना गुलाम बनविणारे आहे. मनाला उत्साह आणि ऊर्जा देणारे, एकमेकांवर प्रेम करायला शिकविणारे, वैज्ञानिक जाणिवा निर्माण करणारे आणि हातांना रोजगार देणारे शिक्षण असायला हवे.
यावेळी महाराष्ट्र अंनिस व बेळगाव येथील महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सरोजमाई पाटील, ॲड. एन. आर. पाटील, अभियंता सुनील पाटील, रयतच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य एम. बी. शेख, कर्मवीर प्रबोधिनीचे प्रा. अजित पाटील यांचा सत्कार करण्यात आला. ॲड. एन. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. प्रमोद गंगणमाले यांनी अहवाल वाचन केले. डॉ. अलका पाटील यांनी पारितोषिक अहवाल वाचन केले. डॉ. राजेश दांडगे, डॉ. सीमा परदेशी, डॉ. धनश्री खटावकर यांनी सूत्रसंचालन केले. ओंकार घोडके यांनी आभार मानले.
यावेळी नियामक मंडळाचे सदस्य, माजी उपनगराध्यक्ष बी. ए. पाटील, उपप्राचार्य डॉ. नितीन शिंदे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. डी. जी. चव्हाण, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. अमित माने, विश्वास सुतार उपस्थित होते.