Sangli: लाचखोर सहायक आयुक्ताला एक दिवसाची पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 18:44 IST2025-04-19T18:43:28+5:302025-04-19T18:44:41+5:30
सांगली : बचतगटाने घेतलेल्या टेंडरचे बिल मंजूर केल्याबद्दल ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक केलेल्या समाज कल्याणच्या सहायक आयुक्त ...

Sangli: लाचखोर सहायक आयुक्ताला एक दिवसाची पोलिस कोठडी
सांगली : बचतगटाने घेतलेल्या टेंडरचे बिल मंजूर केल्याबद्दल ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक केलेल्या समाज कल्याणच्या सहायक आयुक्त नितीन उषा संपत उबाळे (वय ४६, रा. खरे क्लब हाऊसजवळ, विश्रामबाग, सांगली. मूळ रा. साखरवाडी, ता. फलटण) याला एक दिवसाची पाेलिस कोठडी सुनावली.
तक्रारदार यांचा बचतगट आहे. बचतगटाने समाज कल्याण विभागाकडील जेवण पुरवण्याच्या एक टेंडर घेतले होते. तक्रारदार यांच्या बचतगटाचे ८ लाख १२ हजार रुपये बिल मंजूर केल्याबद्दल दहा टक्केप्रमाणे लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोड करून पाच टक्केप्रमाणे ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत विभागाच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले. त्यानंतर उबाळे याने लाचेची रक्कम दि. १७ रोजी घेऊन येण्यास सांगितले.
गुरुवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक आयुक्त उबाळे याच्या कक्षाजवळ सापळा रचला. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडून ४० हजार रुपये लाच स्वीकारताना त्याला अटक केली. लाचखोर उबाळे याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार सायंकाळी उशिराने गुन्हा दाखल केला. तसेच त्याच्या घराची झडती घेण्यात आली. शुक्रवारी लाचखोर उबाळे याला सांगलीतील न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.