राजापूर येथे विजेच्या तीव्र धक्क््याने मदतनीसाचा मृत्य
By admin | Published: December 14, 2014 10:58 PM2014-12-14T22:58:59+5:302014-12-14T23:50:12+5:30
ग्रामस्थ आक्रमक : तासगावात अडीच तास रास्ता रोकोू
तासगाव : राजापूर (ता. तासगाव) येथे आज विजेच्या खांबावर दुरुस्तीसाठी चढलेल्या एकाचा शॉक लागल्याने खाली पडून मृत्यू झाला. अशोक बबन सुतार (वय ३५, रा. राजापूर) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त झालेल्या राजापूर ग्रामस्थांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तासगाव-सांगली रस्ता दत्तमाळावर सुमारे अडीच तास रोखून धरला. या आंदोलनामुळे तणाव निर्माण झाला होता. अखेर वीज कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
राजापूर येथे अशोक सुतार हे वीज कार्यालयाकडे मदतनीस म्हणून काम करीत होते. ते अधिकृतरित्या कंपनीकडे कामाला नव्हते. लाडमळा परिसरातील डीपी दुरुस्तीकामी गेलेल्या अशोक सुतार यांना विजेचा शॉक बसल्याचा प्रकार दुपारी १२.४५ वाजता घडला. सुतार यांचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेनंतर वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करत येथील ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. ग्रामस्थ ग्रामीण रुग्णालयात ठाण मांडून होते.
निमणी उपविभागांतर्गत राजापूर गाव येत असल्याने शाखा अभियंता पांढरे व अन्य एक अधिकारी पोलीस ठाण्यात होते. याबाबतीत निर्णय होत नसल्याने जमलेल्या ग्रामस्थांनी दत्तमाळावरील वसंतदादा महाविद्यालयासमोरच्या चौकात ‘रास्ता रोको’ करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण रुग्णालयात बसलेले ग्रामस्थ मुख्य रस्त्यावरील चौकात येऊन बसल्याने वाहतूक थांबली. तासगाव, विटा, सांगली, मणेराजुरी व बाह्य वळण रस्ता या मार्गावर वाहतूक ठप्प झाली. तासगाव पोलिसांसह सांगलीतून कमांडोची तुकडी व अन्य पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. राजापूर ग्रामस्थ त्यांच्या मुद्द्यावर ठाम असल्याने या प्रकरणात मार्ग निघत नव्हता. चर्चेसाठी कनिष्ठ स्तरावरील अधिकारी आल्याने ग्रामस्थांनी वरिष्ठ स्तरावरील अधिकारी आले पाहिजे, अशी मागणी केली. अखेर कनिष्ठ अभियंता पांढरे व वायरमन पोतदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाल्याने आंदोलन स्थगित झाले. दोघांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस निरीक्षक रमेश बनकर यांनी सांगितले. (वार्ताहर)
प्रवासी अडकले !
रास्ता रोको सुमारे अडीच तास सुरू राहिल्याने एसटीमधील प्रवासी चांगलेच अडकले. यात विशेष करून वृद्धांना त्रास झाला. आंदोलन अचानक झाल्याने कुणालाच काही माहिती नव्हती. तासगाव शहरात याची चर्चा जोरदार होती. नागरिक आंदोलनस्थळी बघण्यासाठी जात असल्याने गर्दीही वाढत होती. त्यात रात्र झाल्याने अंधारात आंदोलन सुरू राहिले. हळूहळू आंदोलनस्थळी बघ्यांची गर्दी वाढतच होती, तर दुसरीकडे मुख्य रस्त्यावर मालवाहतूक ट्रक, एस. टी. यासह चारचाकी, दुचाकी वाहनांची वाहतूक ठप्प झाल्याने रांगा वाढतच चालल्या होत्या. आंदोलन स्थळापासून लांबपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. एकीकडे चर्चा सुरू होती. पण निर्णय होत नसल्यामुळे आंदोलनाची वेळ वाढत गेली. अडीच तासानंतर आंदोलन स्थगित झाले.