जतमध्ये लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:36 PM2018-11-27T23:36:23+5:302018-11-27T23:36:37+5:30
जत : फसवणुकीच्या गुन्ह्यातील रक्कम परत मिळवून देण्यासाठी दोन लाखाच्या लाचेची मागणी करून त्यापैकी वीस हजार रुपये घेताना जत ...
जत : फसवणुकीच्या गुन्ह्यातील रक्कम परत मिळवून देण्यासाठी दोन लाखाच्या लाचेची मागणी करून त्यापैकी वीस हजार रुपये घेताना जत पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक गजानन वसंत कांबळे (वय ३५) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता ही कारवाई पोलीस ठाण्यातच करण्यात आली.
शेतात सौर ऊर्जा यंत्रणा बसवून देतो, तसेच शासनाचे अनुदान मिळवून देतो, असे खोटे सांगून एका भामट्याने तालुक्यातील कोसारी व बनाळी येथील चार शेतकºयांची सुमारे दहा लाख रुपयांची फसवणूक करून पलायन केले होते. यासंदर्भात शेतकºयांनी जत न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने फरारी भामट्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल केला होता. याचा तपास सहायक निरीक्षक गजानन कांबळे याच्याकडे होता. त्याने या शेतकºयांना बोलावून घेऊन फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्याच्या बदल्यात दोन लाखाची मागणी केली. संबंधित शेतकरी तयार झाल्यानंतर त्यापैकी पन्नास हजार रुपये प्रथम व उर्वरित दीड लाख रुपये नंतर द्या, असे कांबळेने सांगितले. ठरलेल्या पन्नास हजारांपैकी वीस हजार रुपये घेऊन शेतकरी मंगळवारी जत पोलीस ठाण्यात आला होता. दुपारच्या जेवणाच्या सुटीत पोलीस ठाण्यातील गर्दी कमी झाल्यानंतर शेतकºयाने वीस हजार रुपये कांबळे याला दिले. तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी कांबळे याला ताब्यात घेतले. यावेळी आपल्याला जबरदस्तीने पैसे दिल्याचे सांगून, आपण लाच घेतलीच नाही, असा बनाव करण्याचा प्रयत्न कांबळेने केला, परंतु ‘लाचलुचपत प्रतिबंधक’च्या अधिकाºयांनी तो प्रयत्न उधळून लावत त्याला अटक केली..
जत पोलीस ठाण्यातील चौथी कारवाई
जत पोलीस ठाण्यात यापूर्वी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सीमा आघाव-बढे, सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. शेख, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे व मंगळवारी गजानन कांबळे याला लाच घेताना रंगेहात पकडले आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचा कारभार चव्हाट्यावर येऊ लागला आहे.
अपहाराची चर्चा
सहायक निरीक्षक गजानन कांबळे हा २००९ च्या बॅचचा अधिकारी आहे. २० ते २५ आॅक्टोबर या दरम्यान जत येथे रात्रपाळीसाठी असताना त्याने मोठ्या रकमेचा अपहार केल्याची चर्चा आहे; परंतु याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाºयांनी चौकशी केली. मात्र, कांबळेवर कारवाईस टाळाटाळ होत असल्याचे बोलले जाते.