Sangli News: सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा शेततळ्यात पोहताना बुडून मृत्यू, शेतात जेवणाचा बेत आला जिवावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 04:46 PM2023-06-14T16:46:41+5:302023-06-14T16:48:15+5:30
जेवण झाल्यानंतर शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले अन् अचानक बुडाले
मिरज : सोनी (ता. मिरज) येथे सहकारी पोलिसाच्या शेतात जेवणासाठी गेलेल्या तिमोती दयानंद आवळे (वय ५६, रा. मिरज) या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. पोहताना दम लागल्याने आवळे यांचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलिस मुख्यालयात मोटर परिवहन विभागात सहायक पोलिस उपनिरीक्षक तिमोती आवळे यांच्यासह मुख्यालयातील परिवहन विभागातील पाच ते सहा कर्मचारी मंगळवारी भोसे (ता. मिरज) येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर गृहरक्षक दलाच्या वाहनचालकाच्या परीक्षेसाठी गेले होते. परीक्षा झाल्यानंतर तिमोती आवळे त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी विनायक कांबळे यांच्या सोनीतील शेतात जेवण व पार्टीसाठी गेले होते.
जेवण झाल्यानंतर विनायक कांबळे व तिमोती आवळे शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले. त्यांचे इतर सहकारी शेततळ्याच्या काठावर होते. पोहताना अचानक आवळे पाण्यात बुडाले. पाण्यातून बाहेर काढेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. पाण्यात दम लागल्याने ते बुडाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद आहे.