सांगलीत महापूर गृहीत धरून उपाययोजना राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:17 AM2021-07-24T04:17:15+5:302021-07-24T04:17:15+5:30
सांगली : सांगलीत कृष्णेची पाणीपातळी ५२ फुटांपर्यंत जाईल हे गृहीत धरून उपाययोजना राबविण्याचे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. ...
सांगली : सांगलीत कृष्णेची पाणीपातळी ५२ फुटांपर्यंत जाईल हे गृहीत धरून उपाययोजना राबविण्याचे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. नागरिक व शेतकऱ्यांनी कुटुंबासह जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की, कोयना पाणलोट क्षेत्र तथा नवजा, महाबळेश्वर आदी परिसरात विक्रमी पाऊस होत आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात २४ तासांत ६०५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. नवजामध्ये ७३१ मिलीमीटर झाला. कोयनेत २४ तासांत १८ टीएमसी इतका विक्रमी पाणीसाठा झाला. त्यामुळे धरणातून ४५ हजार क्यूसेक पाणी सोडावे लागले, तो ५० हजार क्यूसेकपर्यंत वाढू शकतो. वारणेतून २५ हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. पूरप्रवण १०४ गावांतील रहिवाशांच्या स्थलांतरासाठी सज्ज रहावे. दरम्यान, शुक्रवारी सकाळपर्यंत वाळवा तालुक्यातील पाच हजार, तर महापालिका क्षेत्रासह जिल्हाभरात दहा हजार लोकांचे स्थलांतर झाले होते. दरम्यान, २०१९ मध्ये सांगलीत आयर्विन पुलाजवळ ४५ फूट पाणीपातळी असताना शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. यावर्षीही ५२ फुटांचा अंदाज वर्तविल्याने पुन्हा महापुराचा तडाखा बसणार हे निश्चित झाले.