रिलायन्स ज्वेलर्स दरोड्यावेळी सुबोध सिंग जेलमधून होता साथीदारांच्या संपर्कात
By शीतल पाटील | Published: December 4, 2023 09:25 PM2023-12-04T21:25:32+5:302023-12-04T21:25:40+5:30
बारा दिवसाची कोठडी; काही गुन्हे उघकीस येण्याची शक्यता
सांगली: रिलायन्स दरोडा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सुबोध सिंग याची दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. दरोडा पडला तेव्हा बिहारमधील आदर्श सेंट्रल जेल बेऊर (पाटणा) येथून तो मोबाईलच्या माध्यमातून साथीदारांच्या संपर्कात होता, अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. लुटीतील सोने जप्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे सुबोधसिंग याच्यावर दरोड्याचे देशभरात ३२ गुन्हे दाखल आहेत. या
व्यतिरिक्त खून, खूनाचा प्रयत्न, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला, दंगल, फसवणूक आणि अवैध शस्त्र बाळगणे आदी गुन्हे राज्यातील विविध पोलिस ठाण्यात नोंद आहेत. देशातील सात ते आठ राज्यात सुबोध सिंग टोळीने वित्तीय संस्थेच्या कार्यालयांना लक्ष्य करुन कोट्यावधीची लूट केली आहे. या लुटीतील रक्कम हस्तगत करण्यात आतापर्यत बिहारसह अन्य राज्यातील पोलिसांना अपयश आले आहे.
सुबोध सिंग मागील सहा वर्षापासून कारागृहातच असल्यामुळे त्याला अन्य कोणत्या राज्याने तपासाकरिता ताब्यात घेतल्याची माहिती उपलब्ध नाही. मात्र सांगली पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करुन सुबोध सिंगचा ताबा घेतला आहे. त्यामुळे त्याच्याकडून रिलायन्स ज्वेल्स लुटीतील सोने हस्तगत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यात सुबोध सिंग यास स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आलेले आहे. त्यास बारा दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे. त्याच्या कोठडीबाहेर पोलिस कर्मचाऱ्यांचा खडा पहारा आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या प्रवेशव्दारापाशी तसेच मागील बाजूस हत्यारबंद पोलिस तैनात करण्यात आले आहेत.