अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणीने सांगलीकर शोकाकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:13 AM2018-08-17T00:13:18+5:302018-08-17T00:13:22+5:30

Atal Bihari Vajpayee's memory reminds Sangliker | अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणीने सांगलीकर शोकाकुल

अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणीने सांगलीकर शोकाकुल

googlenewsNext

सांगली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांगलीकर शोकाकुल झाले. अटलजींनी सांगलीला चार ते पाच वेळा भेट दिली होती. जनसंघाचे नेते, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, परराष्ट्रमंत्री, विरोधी पक्षनेता आदी महत्त्वाच्या पदांवर काम करताना ते सांगलीत आले. कधी मित्राचा सन्मान करण्यासाठी, तर कधी जनसंघाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने! त्यांच्या तेव्हाच्या भाषणांची आठवण आजही सांगलीकरांच्या स्मृतीत आहेत.
१९६७ चे वर्ष... अटलजी पहिल्यांदा सांगलीत आले. तेव्हा ते जनसंघाचे नेते होते. जनसंघाच्या सांगली शाखेच्यावतीने ५१ हजार रुपयांची देणगी देण्याचा कार्यक्रम आखला होता. या कार्यक्रमासाठी ते सांगलीत आले. राजवाडा चौकातील जनसंघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
१९७८ मध्ये अटलजी परराष्ट्रमंत्री होते. सांगलीच्या नगरवाचनालयाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आजीव सदस्यत्व दिले होते. त्या कार्यक्रमासाठी अटलजी सांगलीत आले. नगरवाचनालयातील कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. जनसंघातून बाहेर पडून भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर १९८५-८६ मध्ये ते मिरजेत एका सभेसाठी आल्याची आठवण प्रकाश बिरजे यांनी सांगितली.
१९९५ मध्ये विरोधी पक्षनेता असताना ते सांगलीत आले. निमित्त होते... ५२ वर्षे मैत्रीचे बंध जुळलेल्या कृषी तज्ज्ञ प्र. शं. ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभाचे. ठाकूर व अटलजी १९४२-४३ मध्ये ग्वाल्हेरला भेटले. तेथून त्यांची मैत्री सुरू झाली. ठाकूर नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रात आले, सांगलीत स्थायिक झाले. पण त्यांच्या मैत्रीचा बंध अतूटच राहिला. यावेळी अटलजींच्याहस्ते ‘भूमिपुत्राचा सांगाती’ या ठाकूर यांच्यावरील गौरव अंकाचे प्रकाशनही करण्यात आले. ‘सांगलीत कित्येक वर्षे कृष्णामाई वाहते आहे. कृष्णामाई तीच आहे. आता तीही बदलते आहे. सरकार हे येईल, ते येईल, पक्ष हा असेल, तो असेल, पण भारतमातेची सेवा, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे’, असा त्यांच्या भाषणाचा गोषवारा होता.
त्यानंतर त्यांनी शांतिनिकेतनला आवर्जून भेट दिली. शांतिनिकेतनच्या परिसरामध्ये हुतात्म्यांच्या स्मृती तेवत ठेवणाऱ्या स्मृती स्तंभाला त्यांनी अभिवादन केले. यानंतर त्यांनी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली.
शांतिनिकेतनची गुरु-शिष्य परंपरा त्यांनी समजून घेतलीच, पण त्यासोबत शिक्षण व्यवस्थेत काही अमूलाग्र बदल करता येतील का, याबाबतही चर्चा केली. ग्रामीण विकास, स्वयंपूर्ण खेडी, पंचायत राज, सत्तेचे विकेंद्रीकरण या महत्त्वपूर्ण विषयांवर दोघांनी अनेक महत्त्वाच्या पर्यायांवर चर्चा केली होती.

Web Title: Atal Bihari Vajpayee's memory reminds Sangliker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.