आटपाडीत रंगला युवक महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:52 PM2018-10-29T23:52:03+5:302018-10-29T23:52:24+5:30
शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : बहारदार सादरीकरण, तरुणाईचा उत्साह आणि विविध कलाप्रकारातील उत्स्फूर्त सहभागाने जिल्हाभरातून आलेल्या ...
शरद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी : बहारदार सादरीकरण, तरुणाईचा उत्साह आणि विविध कलाप्रकारातील उत्स्फूर्त सहभागाने जिल्हाभरातून आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी युवक महोत्सव गाजविला. सोमवारी आटपाडीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवक महोत्सव उत्साही वातावरणात पार पडला. भारतीय संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडविले. तेराशेवर विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे महोत्सवाची रंगत वाढली. रात्री उशिरापर्यंत विविध कलाप्रकारांचे सादरीकरण सुरू होते.
शिवाजी विद्यापीठांतर्गत ३८ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव आटपाडीत झाला. श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाने संयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, जिल्हा समन्वयक संपत पार्लेकर, एम. एल. होनगेकर, प्रभारी प्राचार्य डॉ. विजय लोंढे, सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष प्रा. डी. डी. जाधव यांची उपस्थिती होती.
सकाळपासूनच जिल्हाभरातील ४३ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे आटपाडीत आगमन सुरू होते. उद्घाटनानंतर मुख्य स्पर्धां सुरु झाली. एकूण सात रंगमंचांची सोय केली होती. १४ कलाप्रकारात विद्यार्थ्यांनी कला सादर केली. लोकनृत्य, लोकसंगीत, गायन, एकांकिकांतून विद्यार्थ्यांनी आटपाडीकरांना सांस्कृतिक मेजवानीच दिली. ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या नावच्या मुख्य रंगमंचावर लोकनृत्य व लोककला सादर करण्यात आल्या. पथनाट्यातून सामाजिक संदेश देत विद्यार्थ्यांनी समाजाप्रतीची बांधिलकी दृढ केली. विविध कलाप्रकारांचे सादरीकरण रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने व त्यानंतर निकाल जाहीर होणार असल्याने निकालाबाबत उत्सुकता लागली होती.