धक्कादायक! डफळापूरातील एटीएम दरोडा प्रकरण, पोलीसच निघाला चोरीतील सूत्रधार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 03:56 PM2022-08-02T15:56:12+5:302022-08-02T15:56:45+5:30
चोरट्यांनी मशीन वजनाने जड असल्याने व मशीनमधून पैसे निघत नसल्याने रस्त्यावरच एटीएम मशीन टाकून पलायन केले होते.
जत : डफळापूर (ता. जत) येथे दाेन दिवसांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमवर दरोड्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणाचा सूत्रधार पोलीस कर्मचारीच असल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. जत पाेलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील सचिन यशवंत कोळेकर (रा. रामपूर, ता. जत) या कर्मचाऱ्यासह सुहास मीरासाहेब शिवशरण (रा. रामपूर, ता. जत) या साथीदाराला साेमवारी अटक केली.
डफळापूर येथे २९ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुख्य रस्त्यावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम सेंटर फाेडून दराेड्याचा प्रयत्न झाला हाेता. एटीएम मशीन ओढून बाहेर काढण्यात आले हाेते. ते पळवून नेण्याचा प्रयत्न चाेरट्यांचा होता. मात्र अवजड मशीन उचलता न आल्याने ते रस्त्यावरच टाकून चाेरट्यांनी पलायन केले होते. दोन दिवसांपासून जत पोलिसांनी अत्यंत शिताफीने यंत्रणा राबवत तपासाला गती दिली. साेमवारी या प्रकरणाचा छडा लागला.
तपासामध्ये कवठेमंहाकाळ पोलिसात कार्यरत असलेला व मूळचा जत तालुक्यातील रामपूर येथील सचिन यशवंत कोळेकर हाच या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार असल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला. कोळेकर व त्याचा साथीदार सुहास शिवशरण या दोघांना जत पोलिसांनी अटक केली. सोमवारी दोघांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
शुक्रवारी रामपूर येथील प्रतिष्ठित शेतकऱ्याची माेटार घेऊन दाेघे डफळापूरमधील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमसमाेर आले. माेटारीच्या साहाय्याने त्यांनी एटीएम मशीन बाहेर ओढले. हे मशीन पळवून नेण्याचा त्यांचा प्रयत्न हाेता. मात्र मशीन वजनाने जड असल्याने व मशीनमधून पैसे निघत नसल्याने दाेघांनी रस्त्यावरच एटीएम मशीन टाकून पलायन केले. पावसामुळे चिखलात मिळालेल्या गाडीची चाके रुतलेल्या खुणा तसेच ठसेतज्ज्ञांच्या मदतीने या घटनेचा छडा लावण्यात यश आले.
या घटनेमुळे जत पोलिसांचे कौतुक होत असले तरी पोलीस दलातील कर्मचाऱ्यानेच चोरीचा प्रयत्न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त हाेत आहे. पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी या प्रकरणाचा तपास केला.