अक्षदा हाेळकरच्या पुरस्कारामुळे नागजकरांमध्ये उत्साहाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:30 AM2021-03-01T04:30:58+5:302021-03-01T04:30:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ढालगाव : नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील अक्षदा माणिक होळकर या विद्यार्थिनीला सन २०२०-२१मधील ‘पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ढालगाव : नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील अक्षदा माणिक होळकर या विद्यार्थिनीला सन २०२०-२१मधील ‘पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे. आदर्श प्रशालेची राष्ट्रीय खेळाडू अक्षदा माणिक होळकर हिला ‘जिल्हा उत्कृष्ट खेळाडू’ पुरस्कार (मैदानी) जाहीर झाला आहे.
मागील २० वर्षांमध्ये हा पुरस्कार मिळवणारी आदर्श प्रशालेची ती पाचवी राष्ट्रीय खेळाडू आहे. यामुळे नागजकरांमधून तिचे अभिनंदन हाेत आहे. यापूर्वी सुजाता पाटणकर, मीना चव्हाण, पूजा खोत, जास्मिन तांबोळी यांनी हा पुरस्कार मिळवला आहे. यावर्षी अक्षदा होळकर हिने हा पुरस्कार मिळवून प्रशालेच्या व नागजच्या इतिहासामध्ये आपले नाव कोरले आहे. याचा सर्व नागजवासियांना अभिमान असल्याची प्रतिक्रिया नागजच्या सरपंच नंंदिनी देसाई यांनी दिली. पाचवीमध्ये शाळेत प्रवेश घेतल्यापासून मैदानी खेळांची आवड असणारी अक्षदा नेहमीच इतरांपेक्षा वेगळेपणा सिद्ध करायची. उंचीने कमी असली तरी, जलद चालणे या क्रीडा प्रकारांमध्ये तिने राष्ट्रीय स्तर, खेलो इंडिया या केंद्र शासनाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.
घरी असणारी खेळाची परंपरा व आवड तिने जोपासली आहे. जिल्हा पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत वेगळेपणा सिद्ध करत तिने मेहनतीने केलेला सराव, तंत्रशुद्ध मार्गदर्शन, अंगी असलेली जिद्द व चिकाटीच्या जोरावर अनेक राज्य स्पर्धांमध्ये यश मिळवले. या यशामध्ये तिचे आई, वडील व क्रीडाशिक्षक विजयकुमार पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. मुख्याध्यापक संजयकुमार झांबरे आणि संस्थापक औदुंबर पाटील यांचे मार्गदर्शन, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन तिला नेहमीच मिळत आहे. तिला मिळालेल्या पुरस्कारामुळे प्रशालेचे सर्व खेळाडू व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.