वारणावती परिसरात बिबट्याच्या सततच्या दर्शनाने भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:19 PM2018-11-11T23:19:56+5:302018-11-11T23:20:00+5:30
वारणावती : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील वारणावती परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. ...
वारणावती : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील वारणावती परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. वारणावतीनजीकच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. या प्रकल्पात पन्नासहून अधिक बिबट्यांचे अस्तित्व आहे. प्रकल्पाला कुंपण नसल्यामुळे अन्नाच्या शोधात बिबटे प्रकल्पाबाहेर येऊ लागले आहेत.
काही दिवसांपूर्वी प्रकल्पापासून चाळीस किलोमीटरवर असणाऱ्या कापरी तसेच वाळवा तालुक्यातील गोटखिंडी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. गतवर्षी पणुंब्रेजवळ दोन बिबटे मृतावस्थेत सापडले होते. यावरून सह्याद्री प्रकल्पातील बिबटे प्रकल्पाबाहेर विहार करत असल्याचे सिद्ध झाले होते. गेल्या दोन वर्षांत या बिबट्यांनी परिसरातील शेतकºयांच्या शेळ्या, गाई, मेंढ्यांवर हल्ले करून त्यांना ठार केल्याच्या घटना वाढल्या आहेत. वाड्या-वस्त्यावर दिसणारे हे बिबटे आता चक्क मानवी वस्तीत दिसू लागल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वी वारणावतीत करमणूक केंद्राजवळ सुभाष कांबळे यांना रात्रीच्यावेळी चक्क रस्त्यावर बिबट्या दिसला, तर चांदोलीला आलेल्या काही पर्यटकांना सोनवडे शाळेजवळ हुतात्मा नानकसिंग विद्यालयाजवळील रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाले, तर मणदूर येथील राजेंद्र कांबळे यांच्या मालकीची दोन पाळीव कुत्री बिबट्याने पळवून नेली.