संजयकाका-पडळकर गटात आटपाडीत मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:19 PM2018-09-26T23:19:22+5:302018-09-26T23:19:38+5:30

Atpadat fights in Sanjayanka-Padlakar group | संजयकाका-पडळकर गटात आटपाडीत मारामारी

संजयकाका-पडळकर गटात आटपाडीत मारामारी

Next

आटपाडी : खासदार संजयकाका पाटील आणि युवा नेते गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये बुधवारी तब्बल तीनवेळा मारामारी झाली. पोलिसांनी दोनवेळा लाठीचार्ज करून जमाव पांगवला. दोन्ही गटातील ५० जणांविरुध्द गुन्हा दाखल करून पोलिसांनी सातजणांना ताब्यात घेतले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आटपाडीत जादा पोलीस बंदोबस्त मागविला आहे.
बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास यल्लाप्पा हणमंत पवार (वय २६, रा. मापटेमळा, आटपाडी) याने गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केल्याने, राजू नाना जानकर (२५, रा. भेंडवडे, ता. खानापूर) या दोघांत मारामारी झाली. राजू जानकर हे गोपीचंद पडळकरांचे समर्थक आहेत. त्यानंतर खासदार पाटील समर्थकांनी बिरुदेव खांडेकर यांना मारहाण केली. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आबानगर चौकात पडळकर समर्थक गोळा झाले. तेव्हा पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगवला. त्यानंतर साठेनगर चौकात दोन गटात पुन्हा मारामारी झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून जमाव पांगवला.
याप्रकरणी दोन्ही गटाकडून फिर्याद देण्यात आली नाही. त्यामुळे पोलिसांनी हवालदार राम खाडे आणि पोलीस नाईक संतोष गोविंद बेबंडे यांनी दोन्ही गटाविरुध्द फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अनिल महादेव सूर्यवंशी (रा. गोंदिरा), राजू नानासाहेब जानकर (रा. भेंडवडे, ता. खानापूर), बंडुपंत आबा धडस (रा. उंबरगाव), काशिनाथ सोन्याबापू शेंडगे (रा. बोंबेवाडी), बिरुदेव लक्ष्मण खांडेकर (रा. नांगरेमळा), योगेश मोहन मारकड (रा. भानुसेमळा, आटपाडी), ईश्वर अण्णा मेटकरी (रा. गोंदिरा), विक्रम देवडकर (रा. निंबवडे), गणेश पुजारी (रा. पुजारवाडी), काशिनाथ जेडगे (रा. बोंबेवाडी), अजित नाथाजी जाधव, यल्लाप्पा हणमंत पवार, अनिल जाधव, अविनाश चव्हाण, प्रवीण मंडले, लक्ष्मण शिवाजी जाधव, प्रशांत जाधव, सूरज जाधव (सर्व रा. आटपाडी) यांच्यासह ५० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साठेनगर चौकात रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटातील कार्यकर्ते गटा-गटाने थांबले होते. पोलीसही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पडळकरांवरील : टीकेने वाद पेटला
गोपीचंद पडळकरांनी खासदार पाटील यांच्यावर टीका करून भाजपला रामराम केला आहे. आता ते पक्षात नाहीत. हा धागा पकडून सकाळी यल्लाप्पा पवार याने पडळकरांवर त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर बोचरी टीका केली. त्यामुळे दोन गटात संघर्षाची ठिणगी पडली. दिवसभर काठ्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्या घेऊन पोलिसांना चौकात थांबावे लागले.

Web Title: Atpadat fights in Sanjayanka-Padlakar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.