कामात दिरंगाई, आटपाडीचे शाखा अभियंता निलंबित; सांगली जिल्हा परिषदेची कारवाई 

By अशोक डोंबाळे | Published: March 7, 2023 05:23 PM2023-03-07T17:23:03+5:302023-03-07T17:23:36+5:30

ठेकेदार, ग्रामसेवक, विस्तार अधिकाऱ्यांना नोटिसा

Atpadi branch engineer suspended, Action of Sangli Zilla Parishad | कामात दिरंगाई, आटपाडीचे शाखा अभियंता निलंबित; सांगली जिल्हा परिषदेची कारवाई 

कामात दिरंगाई, आटपाडीचे शाखा अभियंता निलंबित; सांगली जिल्हा परिषदेची कारवाई 

googlenewsNext

सांगली : आटपाडी तालुक्यातील मॉडेल स्कूल, अंगणवाडी इमारत बांधकामासह अन्य कामांतील त्रुटी आणि ठेकेदाराला योग्य मार्गदर्शन करून कामे करून घेण्यात दिरंगाई केल्याबद्दल शाखा अभियंता आय. आय. बागवान यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी ही कारवाई केली आहे.

मॉडेल स्कूल, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, दलितवस्ती सुधार योजनेतील कामे दर्जेदार व्हावीत, अशी भूमिका घेऊन डुडी, ओसवाल यांनी जिल्ह्यात दौरे सुरू केले आहेत. आटपाडी, शिराळा, जत, कवठेमहांकाळ तालुक्यांतील कामांची तपासणी केली. यावेळी अनेक ठिकाणी नियमानुसार कामे झाली नाहीत, काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचे दिसून आले. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता भारती बिरंजे यांनीही शाखा अभियंता, ठेकेदारांना दर्जेदार कामे झाली पाहिजेत, अशा वारंवार सूचना दिल्या होत्या. 

तरीही आटपाडी तालुक्यात मॉडेल स्कूल इमारत, अंगणवाड्या, आरोग्य केंद्र आणि दलितवस्ती योजनेतील कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे. तरीही या ठेकेदारांची बिले शाखा अभियंता बागवान यांनी काढून दिली आहेत. या गंभीर त्रुटीबद्दल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ओसवाल यांनी बागवान यांना निलंबित केले आहे. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णयही डुडी यांनी घेतला आहे.

ठेकेदार, ग्रामसेवक, विस्तार अधिकाऱ्यांना नोटिसा

वारंवार सूचना देऊनही ठेकेदारांनी शाळाखोल्या बांधकाम, दलितवस्ती सुधार योजनेतील कामे निकृष्ट दर्जाची केली आहेत. याबद्दल आटपाडी तालुक्यातील संबंधित ठेकेदार, ग्रामसेवक, विस्तार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिशीला उत्तर आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी दिली.

Web Title: Atpadi branch engineer suspended, Action of Sangli Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.