Crime News Sangli: आटपाडीतील सराफी दुकान फोडून १७ लाखांचा ऐवज लंपास, चोरटे चोरीच्याच मोटारीतून पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 04:02 PM2022-06-28T16:02:33+5:302022-06-28T16:03:46+5:30
चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा व संचाची तोडफोड केली. सीसीटीव्ही चित्रीकरणामधील मागील काही दिवसांचे चित्रीकरण काढून टाकले.
आटपाडी : आटपाडी शहरातील मुख्य बाजारपेठेत रविवारी रात्री सराफी दुकान फोडून चोरट्यानी सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा १७ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत ओम गणेश ज्वेलर्सचे मालक शंकर रघुनाथ चव्हाण (रा. यमाजी पाटलाचीवाडी) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी या घटनेत चोरीच्याच वाहनांचा वापर केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
आटपाडीच्या मुख्य बाजार पेठेमध्ये एसटी बसस्थानकानजीक शंकर चव्हाण यांचे ओम गणेश ज्वेलर्स हे दुकान आहे. रविवारी सर्व सराफ व्यावसायिकांची साप्ताहिक सुट्टी असते. याचा गैरफायदा घेत रविवारी रात्री व सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास चव्हाण यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील सुमारे साडेवीस किलो चांदीचे सुमारे सहा लाख १५ हजार रुपयांचे दागिने, पाच लाख रुपयांचे वीस तोळे जुने मोडीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम पाच लाख ७५ हजार रुपये असा एकूण १६ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
यावेळी चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा व संचाची तोडफोड केली. सीसीटीव्ही चित्रीकरणामधील मागील काही दिवसांचे चित्रीकरण काढून टाकले.
या दुकानाच्या शेजारी महाराष्ट्र प्रिंटिंग प्रेस आहे. या प्रेसचे मालक त्याच इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहतात. त्यांच्या घरातील एका महिलेस खाली दुकानाजवळ कशाचा तरी आवाज येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी वरच्या मजल्यावरुन खाली येऊन पाहण्याचा प्रयत्न करत असतानाच चोरट्यांना त्यांची चाहुल लागली आणि त्यांनी तेथून पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला. तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. पण श्वान घटनास्थळीच घुटमळले.
चोरटे सांगोल्याचे असल्याची शंका
हे चोरटे सांगोला तालुक्यातून आले असल्याचे तपासात पुढे आले आहे. चोरट्यांनी वाकी (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथून एक चारचाकी वाहन चोरून आणले होते. ते वाहन आटपाडीतील मुलाणकी येथे सोडले. तेथीलच जावेद मुलाणी यांची मोटार त्यांनी चोरली. त्या गाडीतूनच त्यांनी आटपाडी शहरात प्रवेश केला. सराफी दुकानात चोरी केली आणि पुन्हा त्याच मोटारीतून सांगोला तालुक्यात प्रवेश केला. बामणी येथे ही मोटार सोडून त्यांनी पळ काढला. यामुळे चोरटे सांगोला तालुक्यातील असण्याची शक्यता आहे.