आटपाडी प्रकरण : गोपीचंद पडळकर, पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 11:12 AM2021-11-19T11:12:08+5:302021-11-19T11:13:04+5:30
सांगली : आटपाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला हाेता. याप्रकरणी आ. पडळकर आणि ...
सांगली : आटपाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला हाेता. याप्रकरणी आ. पडळकर आणि शिवसेना नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात दाखल केलेला अर्ज गुरुवारी फेटाळण्यात आला. आ. पडळकर, माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह आठजण, तर दुसऱ्या गटाचे तानाजी पाटील यांच्यासह आठजणांचा त्यात समावेश आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. व्ही. जगताप यांच्यासमोर ही सुनावणी झाली.
पंधरवड्यापूर्वी जिल्हा बँक निवडणुकीसाठी प्रतिनिधी निवडीवरून आमदार पडळकर व राष्ट्रवादी-शिवसेना कार्यकर्त्यांत आटपाडी येथे जोरदार वादावादी झाली होती. आमदार पडळकर यांनी अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राष्ट्रवादीच्या राजू जानकर यांनी केला होता. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या गाडीवर दगडफेक केली होती. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे असून, पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड त्याचा तपास करत आहेत.
आटपाडी पोलीस ठाण्यात आमदार पडळकर यांच्यावर खुनी हल्ल्याचा, तर तानाजी पाटील यांच्यावरही बेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार पडळकर यांच्यासह त्यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह आठ तर दुसऱ्या गटाच्या तानाजी पाटील यांच्यासह गटातील आठ अशा १६ जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावर सुनावणी झाल्यानंतर गुरूवारी अर्ज नामंजूर करण्यात आला.
अर्ज नामंजूर झाल्यानंतर दोन्ही गटांच्यावतीने उच्च न्यायालयात अर्ज करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, त्यावर निर्णय झाला नाही. दरम्यान, आमदार पडळकर यांच्या अर्ज सुनावणीसाठी सरकार पक्षातर्फे रियाझ जमादार, तर बचाव पक्षाकडून ॲड. प्रकाश जाधव यांनी तर पाटील यांच्या सुनावणीसाठी सरकार पक्षातर्फे ए. एन. कुलकर्णी, तर बचाव पक्षाकडून ॲड. दीपक शिंदे यांनी काम पाहिले.
आलिशान वाहने ताब्यात
- राजकीयदृष्टया संवेदनशील असलेल्या या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आला आहे.
- त्यानंतर पथकाने आमदार पडळकर यांच्यासह दोन्ही गटातील आलिशान वाहने ताब्यात घेतली आहेत.
- आटपाडी तालुक्यात ठिकठिकाणी छापे टाकून संशयितांना ताब्यात घेऊन तपास सुरू ठेवला आहे.