आटपाडीची लवकरच नगरपरिषद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:19 AM2021-01-10T04:19:43+5:302021-01-10T04:19:43+5:30

सांगली : जिल्ह्यातील आटपाडी नगरपंचायतीची लवकरच नगरपरिषद करण्यात येईल. त्याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाला पाठवावा, अशी सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे ...

Atpadi Municipal Council will soon | आटपाडीची लवकरच नगरपरिषद करणार

आटपाडीची लवकरच नगरपरिषद करणार

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यातील आटपाडी नगरपंचायतीची लवकरच नगरपरिषद करण्यात येईल. त्याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाला पाठवावा, अशी सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

सांगली जिल्ह्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषदांमधील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी नगरविकासमंत्री सांगली दौऱ्यावर आले होते. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, खा. संजयकाका पाटील, आ. अनिल बाबर, सुमनताई पाटील, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी उपस्थित होते.

आटपाडीमधील ग. दि. माडगुळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात येणारे प्रस्तावित नाट्यगृह आणि स्मारक जमीन अधिग्रहणामुळे रखडले आहे, याकडे आ. अनिल बाबर यांनी लक्ष वेधले. त्यावर याबाबत नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढू, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे गीतरामायणकार गदिमा हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या लौकिकाला साजेसे स्मारक उभे करू. आटपाडीच्या विकासाची गाडी रुळावर येण्यासाठी नवनव्या योजना याठिकाणी आणण्यासाठी नगरपंचायतीऐवजी नगरपरिषद करण्यात येईल. त्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.

एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमुळे होणारे बदल लोकप्रतिनिधी व प्रशासनाला लक्षात आणून देण्यासाठी यावेळी विशेष सादरीकरण करण्यात आले. बदललेल्या विकास नियंत्रण नियमावलीचे फायदे लोकांना मिळणार असून हे निर्णय लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागवार कार्यशाळा घेण्यात येईल, असे शिंदे म्हणाले.

विटा, तासगाव येथील पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याच्या तसेच पलुस पाणीपुरवठा योजनेतील भूसंपादनाच्या कामाला गती देण्याच्या सूचना यावेळी सचिव पाठक यांनी केल्या.

Web Title: Atpadi Municipal Council will soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.