Sangli: आटपाडी बलात्कारप्रकरणी संशयित संग्राम देशमुख याला अटक, तीन दिवस पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 17:59 IST2024-09-12T17:58:57+5:302024-09-12T17:59:10+5:30
आटपाडी : आटपाडी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी जिम चालक संग्राम देशमुख याला पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. त्याला न्यायालयात ...

Sangli: आटपाडी बलात्कारप्रकरणी संशयित संग्राम देशमुख याला अटक, तीन दिवस पोलिस कोठडी
आटपाडी : आटपाडी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी जिम चालक संग्राम देशमुख याला पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये जिम चालक संग्राम देशमुख याच्याविरोधात अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला हाेता. हा गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित संग्राम देशमुख हा फरार होता. अकलूज परिसरात एका हॉटेलसमोर गुन्ह्यात वापरलेली चारचाकी लावून ताे माळशिरस रस्त्यावर दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. आटपाडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला अटक केली.
यावेळी गुन्ह्यात वापरलेल्या माेटारीची माहिती देण्यास त्याने टाळाटाळ केली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने माेटार पोलिसांच्या ताब्यात दिली. रात्री उशिरा आटपाडी पोलिस ठाण्यात त्याला हजर करण्यात आले.
त्याची साथीदार परिचारिका सुमित्रा लेंगरे हिला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तिला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, जिम चालक असलेल्या संग्राम देशमुख याने अन्य काही महिला व मुलींशी गैरकृत्य केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बलात्कार प्रकरणातील संशयित जिम चालक संग्राम देशमुख याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने अन्य काही महिला, मुलींबाबत काही गैरकृत्य केले असेल, तर त्यांनी पोलिस ठाण्याशी संपर्क करावा. तक्रार दाखल करावी. पोलिस ठाण्यात समक्ष येणे अशक्य असल्यास तक्रारदार मुलींनी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन त्यांची तक्रार घेण्यात येईल. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. - विनय बहीर, पोलिस निरीक्षक, आटपाडी