आटपाडीत रासपाने जपली माणुसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:17 AM2021-07-24T04:17:42+5:302021-07-24T04:17:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क करगणी : आटपाडी तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत जात असतानाच कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
करगणी : आटपाडी तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत जात असतानाच कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास कुणी पुढे येत नसल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. अशातच रासपाचे सांगली जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर यांनी आपल्या साथीदाराच्या सहकार्याने तळेवाडीतील कोरोनाग्रस्त महिलेवर स्वतः अंत्यसंस्कार करीत माणुसकीचे दर्शन दिले.
तळेवाडी येथील एक महिला कोरोनाबाधित झाली होती. तिला गावातीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. दरम्यान गुरुवारी तिचा मृत्यू झाला. महिला कोरोनाग्रस्त असल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी गावातील कुणीच पुढे येत नव्हते. डॉक्टरांनी रासपाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर यांना माहिती दिली. सरगर यांनी आपले सहकारी सुखदेव महारगुडे, सुहास सरगर यांच्या सहकार्याने कोरोनाग्रस्त महिलेवर अंत्यसंस्कार करीत कुटुंबाला आधार दिला.
कोरोनाच्या संकटात लोक भयभीत आहेत. अशातच कुटुंबातील कुणाचा कोरोनाने मृत्यू झाला तर नातेवाईक व गावकरी अंत्यसंस्कार करण्यास पुढे येत नसल्याने कुटुंबाची अडचण हाेते. मात्र रासपाच्या शिलेदारांनी माणुसकीचे दर्शन घडवीत सर्व काळजी घेत कोरोनाग्रस्त महिलेचे अंत्यसंस्कार करून वेगळा आदर्श निर्माण केला.