आटपाडी तालुक्यास अवकाळीचा तडाखा
By Admin | Published: February 29, 2016 11:29 PM2016-02-29T23:29:03+5:302016-03-01T00:10:22+5:30
कौठुळीत वीज कोसळून बैल ठार : पंचवीस लाखांचे नुकसान; दहा खोल्यांची चाळ पूर्णपणे उद्ध्वस्त
आटपाडी : रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यात २५ लाखाहून अधिक नुकसान झाले. तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या कार्यालयावरच झाड पडले. तसेच कृष्णा पाटील यांची दहा खोल्यांची चाळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या चाळीतील भाडेकरूंचा संसार उद्ध्वस्त झाला, तर कौठुळी येथे वीज पडून एक बैल ठार झाला.
तब्बल साडेचार महिन्यानंतर आटपाडी तालुक्यात आलेल्या पर्जन्यराजाने तालुकावासीयांना चांगलेच झोडपून काढले. आटपाडीत ४० मि.मी., दिघंचीच २० मि.मी., तर खरसुंडी येथे ७ मि.मी. नोंद झालेल्या या पावसाने नुकसान मात्र जादा केले.
येथील धांडोर ओढ्याजवळील जय भवानीनगरमधील कृष्णा भाऊ पाटील यांची १० खोल्यांची पत्र्याची चाळ वादळी वाऱ्याने उद्ध्वस्त केली. या दहापैकी नऊ खोल्यांत भाडेकरू राहतात. प्रत्येक कुटुंबाला दोन खोल्या आणि पुढे पत्र्याचा व्हरांडा होता. वादळी वाऱ्याने पत्रे लोखंडी अॅँगलसह उडून गेले. भिंतीलाही तडे गेले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. तहसीलदार अजित पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
या घटनेत भाडेकरूंचे फ्रीज, टीव्ही यासह संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. आनंदराव कृष्णा पाटील यांचे १ लाख १५ हजार, महादेव सखाराम कदम यांचे १ लाख, राजकुमार शिवराम क्षीरसागर यांचे ७५ हजार, नानासाहेब सर्जेराव कदम यांचे ६५ हजार, मुकेश अर्जुनलाल यादव यांचे ५० हजार, धनाजी कृष्णा मोरूळे यांचे ६० हजार, पतंगराव शंकरराव थोरात यांचे ६५ हजार, रुपाली अरुण देशमुख यांचे ६५ हजार, स्वप्नील अशोक दुधगावकर यांचे २५ हजार, तर जगदीश कमलाकर यांचे ३० हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.
दिघंची येथील मुरलीधर हरी मोरे यांच्या जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडून गेले. सुदैवाने त्यावेळी जनावरे गोठ्यात नव्हती. गोठ्याचे खांब मोडून पडले. त्यामुळे त्यांचे १५ हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा गावकामगार तलाठी माणिकराव देशमुख यांनी केला आहे.
रात्री नऊ वाजता कौठुळी येथील अंबादास गोविंद कदम यांच्या बैलावर वीज पडल्याने हा बैल ठार झाला. त्यामुळे त्यांचे सुमारे ६० हजारांचे नुकसान झाले आहे. हिवतड, गोमेवाडी, नेलकरंजी परिसरातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. (वार्ताहर)
तहसील कार्यालय नव्या इमारतीत कधी?
सध्या कामकाज होत असलेल्या तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या मागे नवीन भव्य इमारत बांधण्यात आली आहे. तिथे मतमोजणीसह संगणकीकृत सात-बारा उतारे देण्याची सोय करण्यात आली आहे. पण या इमारतीच्या उद्घाटनाअभावी तहसीलदारांचे कार्यालय जुन्या इमारतीत आहे. काल रात्री तहसीलदारांच्या कक्षावर मागील बाजूने झाड पडले. त्यामुळे कौले, लाकडे फुटून कार्यालयाचे नुकसान झाले आहे.
पाऊस कमी, नुकसानच जास्त
तब्बल साडेचार महिन्यानंतर आटपाडी तालुक्यात आलेल्या पर्जन्यराजाने तालुकावासीयांना चांगलेच झोडपून काढले. आटपाडीत ४० मि.मी., दिघंचीच २० मि.मी., तर खरसुंडी येथे ७ मि.मी. नोंद झालेल्या या पावसाने नुकसान मात्र जादा केले.