‘जिरवा जिरवी’च्या राजकारणात आटपाडीकरांचा बळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:29 AM2021-09-27T04:29:13+5:302021-09-27T04:29:13+5:30
अविनाश बाड लाेकमत न्युज नेटवर्क आटपाडी : आटपाडी तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी धनगाव येथून करण्यात आलेल्या योजनेचे ९५ टक्के काम ...
अविनाश बाड
लाेकमत न्युज नेटवर्क
आटपाडी
: आटपाडी तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी धनगाव येथून करण्यात आलेल्या योजनेचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ श्रेयावादासाठी आमदार अनिल बाबर यांनी योजनेचे काम बंद पाडल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केला. त्यांचा आरोपाचा व्हिडीओ तालुक्यात चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकारण्यांच्या जिरवाजिरवीत तालुक्यातील सामान्य माणसांचा अकारण बळी जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
आटपाडीतील संत सावता माळी मठात नुकताच एक सामाजिक कार्यक्रम झाला. यावेळी अमरसिंह देशमुख म्हणाले की, आटपाडी तालुक्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात आलेल्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. भिवघाट येथील जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण झाले आहे. कृष्णा नदीकाठीही कामही पूर्ण झाले आहे. योजनेची चाचणी घेण्यात आली आहे. मात्र, या योजनेचे श्रेय मला मिळेल आणि लोक माझे नाव घेतील, या कारणामुळे काही जणांनी योजनेचे काम बंद पाडले आहे. वास्तविक या योजनेचे पाणी मी एकटा पिणार नाही किंवा या योजनेचा मी ठेकेदारही नाही. त्यामुळे माझे एकट्याचे नुकसान होणार नाही. ही योजना झाली नाही तर संपूर्ण तालुक्याचे नुकसान होणार आहे. टेंभू योजनेचे पाणी तालुक्यात आले असले, तरी हे पाणी शेतीसाठी आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य नाही. विटेकरांना जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करून पाणी दिले जाते, तर आटपाडी तालुक्यातील जनतेने शुद्ध पाणी प्यायचे नाही का? असा सवाल देशमुख यांनी केला.
देशमुख यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र, यावर आमदार बाबर यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. देशमुख यांनी थेट आमदार बाबर यांचे नाव घेतले नसले, तरी त्यांचा एकूणच रोख बाबर यांच्याविरुद्ध होता.
चौकट
आटपाडीकर पितात विकतचे पाणी
सध्या आटपाडीसह तालुक्यात शुद्ध पाणी विकणारे अनेक उद्योग निर्माण झाले आहेत. टेम्पोने शुद्ध पाणी विकले जात आहे. त्यामुळे पिण्यासाठी लोकांना पदरमोड करावी लागत आहे. अशा परिस्थितीत लोकांचे धनगाव योजनेकडे लक्ष आहे. पण राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे योजना कधी पूर्ण होणार, याबद्दल संभ्रम आहे.
कोट
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना मी पूर्ण ताकद लावून ही योजना मंजूर करून आणली. तेव्हा तालुक्यात टँकर भरण्यासाठीसुद्धा पाणी उपलब्ध नव्हते. पण मला श्रेय मिळेल, या भीतीने काहींनी योजना बंद पाडली आहे. मात्र मी स्वस्थ बसणार नाही. गेल्यावर्षीच योजना पूर्ण होऊन पाणी मिळाले असते. आणखी काही काळ जाईल, पण मी पूर्ण प्रयत्न करून योजना पूर्ण करणारच.
- अमरसिंह देशमुख
माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद सांगली