आटपाडीच्या ओढ्याला ५०० च्या जुन्या-नव्या नोटांचा पूर आला; नागरिकांनी लुटल्या लाखोंच्या नोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 03:01 PM2024-10-19T15:01:07+5:302024-10-19T15:34:21+5:30

आटपाडी शहरातील शुक ओढ्यात शनिवारी सकाळी पाचशेच्या नोटा सापडल्या.

Atpadi's stream was flooded with 500 rs old new notes; Citizens looted lakhs of notes | आटपाडीच्या ओढ्याला ५०० च्या जुन्या-नव्या नोटांचा पूर आला; नागरिकांनी लुटल्या लाखोंच्या नोटा

आटपाडीच्या ओढ्याला ५०० च्या जुन्या-नव्या नोटांचा पूर आला; नागरिकांनी लुटल्या लाखोंच्या नोटा

संतोष भिसे

लोकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी : चक्क ओढ्याच्या पाण्यामध्ये पाचशेच्या नोटा वाहत आल्याचा प्रकार आटपाडी शहरातील शुक ओढ्यात अंबाबाई मंदिर परिसरामध्ये शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. यावेळी पैसे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. तर अनेकांना पैसे सापडल्याने आनंद झाला होता, मात्र हे पैसे कुठून आले? याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास काही विद्यार्थी ये-जा करत असताना त्यांना ओढ्यातून गदिमा पार्ककडे जाणाऱ्या छोट्या पुलाशेजारील ओढ्यामध्ये पाचशेच्या नोटा दिसल्या. यावेळी त्याने पाण्यात जाऊन पाहिले असता त्यांना पाचशेच्या अनेक नोटा सापडल्या. दरम्यान, शनिवार असल्याने रस्त्यावर भरत असल्याने विक्रेते व व्यापारी व नागरिक मोठ्या प्रमाणात जमले याठिकाणी उपस्थित होते. अनेकांनी ओढ्याच्या पाण्यात जाऊन शोधमोहीम घेतली असता त्यांना पाचशेच्या अनेक नोटा सापडल्या.

प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पैसे असल्याची चर्चा

दरम्यान हे पैसे कोठून येत आहेत? याबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही. एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पैसे असल्याची चर्चा यावेळी नागरिकांमध्ये होती, तर शनिवारी आठवडा बाजार असल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी होती. ही बातमी आटपाडी शहरासह संपूर्ण आटपाडी तालुक्यामधून वाऱ्यासारखी पसरली होती. यामध्ये काही जुन्या व नवीन नोटा सापडल्याने मोठी खळबळ माजली होती.

जुन्या-नव्य़ा नोटा...

दरम्यान, यामध्ये काही जुन्या नोटांंचाही समावेश आहे. ५०० व १००० रुपये मुल्याच्या जुन्या नोटा मोठ्या संख्येने ग्रामस्थांना सापडल्या. १०० रुपये मुल्याच्या जुन्या छपाईच्या नोटाही ओढ्यात पडल्या होत्या. काही नागरिकांना जुन्या नोटा सापडल्याने त्यांची फसगत झाली. नव्या नोटा सापडलेल्यांना मात्र जणू दिवाळीचा बोनसच मिळाला. ओढ्यातील सांडपाण्यात उतरुन ग्रामस्थ नोटा गोठा करीत होते. सांडपाणी ढवळून नोटा शोधण्याचा खटाटोप करीत होते. घरात साठवून ठेवलेल्या जुन्या नोटा कोणीतरी ओढ्यात फेकून दिल्याची शंका ग्रामस्थांत होती. जुन्या नोटा बंद झाल्या असून त्या स्थानिक बॅंकांत स्वीकारल्या जात नाहीत. शिवाय इतक्या मोठ्या संख्येने जुन्या नोटा बाळगणे कायदेशीररित्या गुन्हाही ठरतो. त्यामुळेच कोणीतरी त्या पाण्यात फेकून दिल्याची चर्चा होती. जुन्या नोटांच्या गठ्ठ्यात काही नव्या नोटाही फेकल्या गेल्या असाव्यात अशी शंका आहे

Web Title: Atpadi's stream was flooded with 500 rs old new notes; Citizens looted lakhs of notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली