आटपाडीत १५ गावे संवेदनशील
By admin | Published: February 20, 2017 11:58 PM2017-02-20T23:58:53+5:302017-02-20T23:58:53+5:30
विशेष पोलिस बंदोबस्त : १४० केंद्रांवर आज मतदान, व्हीडीओ शुटिंग
आटपाडी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उद्या मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. संवेदनशील असणाऱ्या १५ गावांत विशेष पोलिस बंदोबस्त तैनात केला असून, संवेदनशील मतदान केंद्रांवर दिवसभर व्हिडीओ शुटिंग करण्याची व्यवस्था केली आहे, अशी माहिती तहसीलदार अजितसिंह पाटील यांनी दिली.
आटपाडी तालुक्यात जि. प. चे चार गट, तर पंचायत समितीचे आठ गण आहेत. एकूण १ लाख १७ हजार ३२६ मतदार आहेत. त्यापैकी निंबवडे पं. स. गणात १५४७०, दिघंची पं. स. गणात १३६२७, कौठुळी गणात १४७४१, आटपाडी गणात १३४९७, घरनिकी गणात १५०२२, खरसुंडी १४७९०, शेटफळे १५७४०, करगणी १४४३९ अशी मतदारांची संख्या आहे. एकूण १४० मतदान केंद्रांवर आज दुपारीच मतदान यंत्रासह ९२४ अधिकारी, कर्मचारी पोहोचले आहेत. प्रत्येक जि. प. गटासाठी २ आणि प्रत्येक पंचायत समिती गणासाठी २ राखीव मतदानयंत्रे ठेवली आहेत.
प्रत्येक पं. स. गणासाठी २ अशा एकूण १६ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.
औरंगाबादचे पोलिस उपअधीक्षक ए. के. सराफ यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, पोलिस निरीक्षक वैशाली पवार (औरंगाबाद) याच्यासह ५ पोलिस उपनिरीक्षक, ६६ पोलिस, ७२ महिला पोलिस, ३५ गृहरक्षक दलाचे जवान आणि दंगल नियंत्रण पथक असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. फिरती पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. (वार्ताहर)