नात्यातील बालिकेवर अत्याचार; एकाला वीस वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:18 AM2021-07-03T04:18:11+5:302021-07-03T04:18:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : अडीच वर्षांपूर्वी परजिल्ह्यातून ऊस तोडणीसाठी आलेल्या कुटुंबातील पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याच्या खटल्यात आरोपीला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : अडीच वर्षांपूर्वी परजिल्ह्यातून ऊस तोडणीसाठी आलेल्या कुटुंबातील पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याच्या खटल्यात आरोपीला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश एस. एम. चंदगडे यांनी २० वर्षांचा सश्रम कारावास व पंधराशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
नामदेव विठोबा जाधव (वय ५८, रा. मंठा, जि. जालना) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालीही त्याला आणखी एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास त्याला आणखी दीड महिना साध्या कारावासाची शिक्षा भाेगावी लागणार आहे.
पीडित मुलीचे वडील कुुटुंबासह ऊस तोडणीच्या कामासाठी शिराळा तालुक्यातील धुमाळवाडी येथे आले होते. त्यांची तिन्ही लहान मुले तात्पुरत्या उभ्या केलेल्या खोपीमध्ये राहत असत. त्यालगतच नात्यातील नामदेव जाधवही राहत होता. दि. २० डिसेंबर २०१८ रोजी खोपीत पाच वर्षाची बालिका एकटीच असल्याची संधी साधत नामदेव जाधव याने तिच्यावर अत्याचार केला. ऊस तोडणीच्या कामावरून आई-वडील परत आल्यानंतर पीडित मुलगी शारीरिक त्रासामुळे रडत होती. तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने अत्याचाराची माहिती दिली. त्यावर मुलीच्या वडिलांनी नामदेव जाधव याला विचारणा केल्यावर त्याने कृत्याची कबुली दिली. शिराळा पोलिसात या घटनेची नोंद झाली होती.
या खटल्याची सुनावणी न्यायाधीश चंदगडे यांच्यासमोर झाली. ही घटना माणुसकीला आणि नात्याला काळीमा फासणारी आहे. अशा समाजविघातक कृत्यामुळे कुटुंब व्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अशा कृत्यांना पायबंद घालण्यासाठी जास्तीत जास्त शिक्षा करावी, अशी मागणी सरकारी वकील शुभांगी पाटील यांनी केली. सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडित मुलगी, तिचे आई, वडील, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी ए. व्ही. घोंगडे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकार पक्षाला चंद्रकांत शितोळे, चंद्रकांत कांबळे यांनी खटल्याच्या कामकाजात सहकार्य केले.