Crime News Islampur: आठ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, बालिकेने हिंमतीने संशयिताच्या तावडीतून केली सुटका; एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 04:16 PM2022-05-30T16:16:46+5:302022-05-30T16:17:57+5:30
या पीडित मुलीने त्वेषाने त्याच्या नाकावर जोरात बुक्की मारून त्याच्या तावडीतून सुटका करून घेत त्याच्या घरातून बाहेर पळत आली. आई जिथे काम करते तेथे जाऊन तिने हा प्रकार आईला सांगितला.
इस्लामपूर : वाळवा तालुक्याच्या एका गावात घरासमोर अंगणात खेळणाऱ्या आठ वर्षीय चिमुरड्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली. ही घटना २५ मे रोजी घडली.
याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण उर्फ गुंड्या अनिल पाटील (बोरगाव, ता. वाळवा) यांच्याविरुद्ध बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करत पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आज, सोमवारी त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात येईल.
पीडित मुलीचे आई-वडील २५ मे रोजी सकाळी कामावर गेले. दुपारी पीडित मुलगी आपल्या मैत्रिणींसमवेत अंगणात खेळत होती. यावेळी प्रवीण याने तिला कलिंगड घेऊन घरी जा, असे सांगितले. त्याला नकार देत या मुलीने मैत्रिणींसमवेत खेळणार असल्याचे स्पष्ट केले. त्यावर प्रवीण याने तू माझ्या मुलीसोबत खेळ, असे सांगत तिला आपल्या घरात आणले.
घरात आल्यावर दरवाजा बंद केला. मुलीस सोफ्यावर बसवून तिच्याशी तो अश्लील चाळे करू लागला. याला विरोध केल्यावर प्रवीणने तिचे तोंड आणि नाक दाबून धरत पुन्हा अत्याचार करीत होता. यावेळी या पीडित मुलीने त्वेषाने त्याच्या नाकावर जोरात बुक्की मारून त्याच्या तावडीतून सुटका करून घेत त्याच्या घरातून बाहेर पळत आली. आई जिथे काम करते तेथे जाऊन तिने हा प्रकार आईला सांगितला. वडील आल्यावर कुटुंबाने धाडस करत प्रवीण पाटील याच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक नीलम जाधव अधिक तपास करीत आहेत.