आष्ट्यात मुख्याधिकाºयांच्या केबीनवर हल्ला : अनुपस्थितीमुळे संताप , दालनात तोडफोड; टेबल- खुर्चीवर पादत्राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:59 AM2018-01-07T00:59:55+5:302018-01-07T01:00:00+5:30
आष्टा : आष्टा नगरपालिकेच्या इतिहासात शनिवारी पहिल्यांदाच नागरिकांनी पालिकेत अनुपस्थित मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्यावरील संताप व्यक्त करीत त्यांच्या केबीनची मोडतोड केली. त्यांची खुर्ची टेबलवर ठेवून त्यावर पादत्राणे ठेवून अनोखा संताप व्यक्त केला. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.
आष्टा नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्याकडे जत व आष्टा नगरपालिकांचीही जबाबदारी आहे. ते आष्टा पालिकेत वेळेवर येत नसल्याने नागरिकांची अनेक कामे खोळंबून राहत आहेत. निवेदन देण्यास आल्यास मुख्याधिकारी व नगराध्यक्ष पालिकेत अनुपस्थित असल्याने गैरसोय होत आहे. येथील पोळ गल्ली, मटण मार्केट येथील जुनी सार्वजनिक मुतारी काढल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत आहे.
तेथे पालिकेने तातडीने स्त्री व पुरुषांसाठी नवीन स्वच्छतागृह उभारावे, अशी मागणी आहे, याबाबतचे निवेदन देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनुप वाडेकर, शंकर भोसले व सुजेंद्र पोळ शनिवार, दि. ६ रोजी सकाळी अकराच्या दरम्यान पालिकेत आले. त्यावेळी पालिकेत काही कर्मचारी आले होते. मुख्याधिकारी आहेत का?, असे त्यांना विचारले असता, मुख्याधिकारी नाहीत, असे उत्तर देण्यात आले. त्यांनी हजेरी रजिस्टर विचारले असता, ते देऊ शकत नाही, असे उत्तर कर्मचाºयांनी दिले. यावरून वादावादी झाल्यानंतर अनुप वाडेकर व शंकर भोसले मुख्याधिकाºयांच्या केबीमध्ये आले. त्यांनी मुख्याधिकारी नसल्याने संतप्त होऊन त्यांची खुर्ची टेबलवर ठेवून त्याशेजारी पादत्राणे ठेवली. केबीनमधील दूरध्वनी व संगणकाची मोडतोड केली. त्यानंतर मुख्याधिकारी नसल्याने पालिका कर्मचाºयांना निवेदन दिले.
दरम्यान, अनुप वाडेकर व शंकर भोसले यांनी शिवीगाळ करून मुख्याधिकारी केबीनची मोडतोड केल्याची फिर्याद पालिकेचे कर्मचारी इकबाल मुजावर यांनी आष्टा पोलिसात दिली आहे. पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील अधिक तपास करीत आहेत.
काम बंद आंदोलन
नगपरिषदेच्या मुख्य इमारतीत शिरून जमावाने मुख्याधिकाºयांच्या दालनातच तोडफोड केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. या घटनेची माहिती समजताच पालिकेचे सर्व कर्मचारी एकत्र आले. त्यांनी पालिकेसमोर ठिय्या मारून काम बंद आंदोलन केले व या प्रकरणातील हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली.
आष्टा नगरपरिषदेत शनिवारी मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या दालनात जमावाकडून केबीनची मोडतोड करण्यात आली व टेबलवर पादत्राणे ठेवण्यात आली.