दारूच्या बाटलीसाठी पारधी कुटुंबाच्या घरावर हल्ला, मारहाण करुन संसारोपयोगी साहित्य जाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 01:16 PM2022-08-13T13:16:48+5:302022-08-13T13:17:22+5:30
बाटली घेतल्यानंतर आणखी एका बाटलीची मागणी केली; पण ती न दिल्याने चव्हाण बंधूंना बघून घेण्याची धमकी देत ते सर्वजण तेथून निघून गेले अन् नंतर मारहाण केली.
जत/माडग्याळ : शेड्याळ (ता. जत) येथे दारूच्या बाटलीसाठी दहाजणांनी सिनेस्टाईलने पारधी कुटुंबाच्या घरावर तुफान दगडफेक करत घरातील साहित्य पेटवून दिले. यात तिघा सख्ख्या भावांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी रात्री आठच्यासुमारास घडली. जत पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.
बादल रमेश चव्हाण (वय २५), सागर रमेश चव्हाण (२२) व आकाश रमेश चव्हाण (२०) अशी जखमींची नावे आहेत, तर सागर चव्हाण याने जत पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून शेडयाळचे माजी सरपंच अशोक पाटील, चंद्रकांत गुगवाड, सुरेश हावगोंडी, सुरेश देवर्षी, मास्तर तेली व अन्य अनोळखी पाच अशा दहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
शेड्याळ येथील बिरबल काळे यांच्या जागेत रमेश नामदेव चव्हाण यांनी पत्र्याचे शेड उभारले आहे. ते पत्नी सखुबाई व मुले बादल, आकाश, सागर यांच्यासह तेथे राहतात. गुरुवारी ते पत्नीसह सोरडी येथे पाहुण्यांकडे गेले होते. तिन्ही मुले घरी होती. रात्री आठच्यासुमारास चंद्रकांत गुगवाड, सुरेश देवर्षी, अशोक पाटील व अन्य एकजण चव्हाण यांच्या घरी आले. त्यांनी चव्हाण यांच्या मुलांकडे वडिलांसाठी आणलेली दारूची बाटली मागितली. बाटली घेतल्यानंतर आणखी एका बाटलीची मागणी केली; पण ती न दिल्याने चव्हाण बंधूंना बघून घेण्याची धमकी देत ते सर्वजण तेथून निघून गेले.
रात्री साडेनऊच्यासुमारास तिघेही घरात असताना घरावर तुफान दगडफेक सुरू झाली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, अशोक पाटील, चंद्रकांत गुगवाड, सुरेश हावगोंडी, सुरेश देवर्षी, मास्तर तेली व अनोळखी पाचजण हातात काठ्या, दगड व हॉकीस्टिक घेऊन आल्याचे दिसले. या सर्वांनी तिघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी सागर व आकाश वळसंगच्या दिशेने पळून गेले. बादल यास दहाजणांनी जबर मारहाण केली. तसेच घरातील फ्रीज, टीव्हीसह अन्य साहित्य बाहेर काढून पेटवून दिले. यानंतर सर्वजण तेथून निघून गेले.
घटनेची माहिती मिळताच आदिवासी समाजाचे जिल्हाध्यक्ष बसवराज चव्हाण, राहुल काळे, जतचे नगरसेवक नामदेव काळे यांनी शेड्याळ येथे धाव घेत जखमी बादल चव्हाण यास सांगलीत उपचारासाठी दाखल केले. या मारहाणीत सागर चव्हाण व आकाश चव्हाण हेही जखमी झाले आहेत. जत पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.