सांगलीत हाँटेल मालकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 03:28 PM2017-10-06T15:28:41+5:302017-10-06T15:28:54+5:30
दारु चे सहाशे रुपये बिल देण्याच्या वादातून सांगलीत माधवनगर रस्त्यावर जकात नाक्याजवळील हाटेल संगमचे मालक प्रकाश शेट्टी यांच्या वर चौघांनी चाकूने हल्ला केला.
सांगली,दि. ६ : दारुचे सहाशे रुपये बील देण्याच्या वादातून माधवनगर रस्त्यावर जकात नाक्याजवळील हॉटेल संगमचे मालक प्रकाश आनंदा शेट्टी (वय ४५, रा. माधवनगर, ता. मिरज) यांच्यावर चौघांनी चाकू, काचेचा ग्लास व दारुच्या बाटल्यांनी हल्ला केला. शेट्टी यांनी प्रतिकार केल्याने चौघांनी चाकू काऊंटरवर टाकून पलायन केले. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली.
हल्ल्यात जखमी झालेल्या आनंदा शेट्टी यांच्यावर माधवनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या डोक्याला व कपाळाला दुखापत झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रमेश भिंगारदिवे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, माधवनगरचे माजी पोलिस पाटील बबन आवळे यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली.
रात्री उशिरा शेट्टी यांचा जबाब घेऊन चार अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हल्लेखोर संजयनगरमधील गुंड म्हमद्या नदाफ टोळीचे सदस्य असल्याची चर्चा आहे. हॉटेलमध्ये पडलेला चाकूू पोलिसांनी जप्त केला आहे. हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने त्यांचा शोध घेणे अवघड बनले आहे.
माधवनगरच्या हॉटेल दुर्गाप्रसादचे मालक प्रकाश शेट्टी यांचे जकात नाक्याजवळ हॉटेल संगम आहे. राज्य महामार्गावरील दारु दुकाने बंदच्या आदेशाने हे दुकान चार महिने बंद होते.
नवीन आदेशामुळे महिन्यापूर्वी दुकान सुरु झाले आहे. गुरुवारी दुपारी चार वाजता २५ ते ३० वयोगटातील चार तरुण दारु हॉटेलमध्ये दारु पिण्यासाठी आले. तब्बल दोन तास ते दारु पित बसले होते. पावणेसहाच्या वाजता त्यांनी वेटरला बिल आणण्यास सांगितले.
वेटरने सहाशे रुपयांचे बील आणून दिले. त्यानंतर चौघांनी शेट्टी यांच्याकडे पाहून तू आमच्याकडे रागाने का पाहत आहेस, अशी विचारणा केली. यावर शेट्टी यांनी मी कुठे रागाने पाहतोय, असे उत्तर दिले. यातून त्यांच्यात वाद सुरु झाला.
वाद घालत चौघेही काऊंटरजवळ आले. त्यांनी शेट्टी यांच्या डोक्यात काचेचे ग्लास व दारुच्या बाटल्या फेकून मारल्या. खिशातील चाकू काढून हल्ला चढविला. शेट्टी यांनी जोरदार प्रतिकार केला. झडापटीत चाकू काऊंटरवर पडला. तेवढ्यात हॉटेलमधील दोन वेटर आरडाओरड करीत बाहेर गेल्याने चौघांनी तेथून पलायन केले.