महापालिकेवर महिलांचा पाण्यासाठी हल्लाबोल घागर मोर्चा : अधिकार्यांना धक्काबुक्की; शिव्यांची लाखोली
By Admin | Published: May 15, 2014 12:41 AM2014-05-15T00:41:40+5:302014-05-15T00:42:01+5:30
सांगली : शामरावनगरमधील अपुर्या पाणीपुरवठ्याविरोधात आज, बुधवारी संतप्त महिलांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर हल्लाबोल केला.
सांगली : शामरावनगरमधील अपुर्या पाणीपुरवठ्याविरोधात आज, बुधवारी संतप्त महिलांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर हल्लाबोल केला. घागरी घेऊन आलेल्या या महिलांनी अधिकार्यांना जाब विचारत धक्काबुक्की केली, शिव्यांची लाखोली वाहिली. काही महिला तर अंगावरही धावून गेल्या. महिलांचा आक्रमक पवित्रा पाहून अखेर पालिकेने दररोज पाणी देण्याचे लेखी पत्र देऊन आपली सुटका करवून घेतली. शहरातील शामरावनगर परिसरातील विठ्ठलनगर, ज्ञानेश्वर कॉलनी, सुंदर कॉलनी, शिवशक्ती कॉलनी या भागात गेल्या काही महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यात आज पाणीच न आल्याने या भागातील महिला व नागरिकांनी सकाळी साडेअकरा वाजता पालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर घागर मोर्चा काढला. अचानक मोर्चा आल्याने पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचार्यांची तारांबळ उडाली. वरिष्ठ अधिकारी नसल्याने कनिष्ठ अभियंता, पाईप निरीक्षक यांना महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पाणी का आले नाही, असा जाब विचारत महिला व नागरिकांनी कर्मचार्यांना धारेवर धरले. निवडणुकीत या भागात पाणी येत होते, आता निवडणुका संपल्यावर पाणी बंद झाले आहे. पालिकेकडून पाण्याचे जादा बिल आकारले जाते. हे बिल आम्ही भरतो. मग पाणी का देत नाही? अशा प्रश्नांची सरबत्तीच महिलांनी केली. कनिष्ठ अभियंता नूरमहंमद मुलाणी व पाईप निरीक्षक संतोष कुंभार यांनी या महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण संतप्त महिलांनी त्यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली. तसेच धक्काबुक्कीचा प्रकारही घडला. वरिष्ठ अधिकार्यांना बोलाविल्याशिवाय मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. टँकरने पाणी पुरवठा करतो, असा पर्यायही पालिका कर्मचार्यांनी दिला. पण त्यालाही महिलांनी नकार दिला. टँकर नको, नळालाच पाणी आले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली. महिला व नागरिक अधिकच आक्रमक झाल्याने अखेर कर्मचार्यांनी मिरजेचे अभियंता बी. एस. पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना पाणीपुरवठा कार्यालयात येण्याची विनंती केली. पाटील यांनीही महिलांशी चर्चा केली. अखेर दररोज पाणी देण्याचे लेखी पत्र नागरिकांना देण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. लेखी हमीनुसार पाणी आले नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला. या आंदोलनात माजी नगरसेवक आनंद परांजपे, प्रकाश कुलकर्णी, दत्तात्रय लोखंडे, संभाजी भोसले, राजू थोरात, पूजा भोसले, मीना रावण, गिरमल पांगे, सुवर्णा आकोळे, विमल शिकलगार, अजित कोरबू, सिंधू रावण यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)