जुन्या भांडणाचा राग, फाळकूट दादांनी यात्रेमध्ये भरगर्दीत पाठलाग करून तरुणाला भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 01:17 PM2021-12-24T13:17:45+5:302021-12-24T13:18:07+5:30

लोणारवाडी ता. कवठेमहांकाळ येथील २४ वर्षीय तरुणाला विठुरायाचीवाडी येथील यात्रेमध्ये भरगर्दीत पाठलाग करीत धारधार शस्त्राने भोसकले. 

Attack on a youth in a crowd during a yatra at Vithurayachiwadi in sangli district | जुन्या भांडणाचा राग, फाळकूट दादांनी यात्रेमध्ये भरगर्दीत पाठलाग करून तरुणाला भोसकले

जुन्या भांडणाचा राग, फाळकूट दादांनी यात्रेमध्ये भरगर्दीत पाठलाग करून तरुणाला भोसकले

Next

कवठेमहांकाळ : पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन कवठेमहांकाळ येथील फाळकूट दादांनी लोणारवाडी ता. कवठेमहांकाळ येथील २४ वर्षीय तरुणाला विठुरायाचीवाडी येथील यात्रेमध्ये भरगर्दीत पाठलाग करीत धारधार शस्त्राने भोसकले. 

शशिकांत सिद्धू खोत वय २४ रा. लोणारवाडी असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर डिंग्या चंदनशिवे याच्यासह चार जणांना कवठेमहांकाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना काल, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

कवठेमहांकाळ येथे दहा दिवसांपूर्वी लोणारवाडी व कवठेमहांकाळ येथील तरुण सर्कस पाहण्यासाठी आले होते. सर्कस सुटल्यानंतर लोणारवाडी व कवठेमहांकाळ येथील तरुणांमध्ये किरकोळ वादातून हाणामारी झाली. काही मध्यस्थीने ही भांडणे मिटवली. परंतु त्यानंतर कवठेमहांकाळ येथील डिंग्या चंदनशिवे हा फाळकूट दादा लोणारवाडी येथील तरुणावर राग धरून होता.

गुरुवारी शशिकांत खोत हा मित्रासह विठुरायाचीवाडी येथे यात्रेसाठी गेले होते. या यात्रेत डिंग्या चंदनशिवे हाही त्याच्या दहा ते पंधरा मित्रांसह आला होता. त्यावेळी लोणारवाडी येथील शशिकांत खोत आणि त्याचे मित्र विठुरायाचीवाडीच्या यात्रेतून बाहेर पडत होते. ते प्रवेशद्वाराजवळ आले असता डिंग्या चंदनशिवे व त्याचे सहकारी शशिकांतच्या पाठीमागे हत्यार घेऊन लागले.

भर गर्दीच्या रस्त्यावर पाठलाग करून शशीच्या पोटावरती तीक्ष्ण हत्याराने डिंग्या आणि साथीदारांनी वार केला. यात्रेची गर्दी रस्त्याने जात असल्याने सर्वांनी दंगा केल्यानंतर हे हल्लेखोर एक वार करून पसार झाले. शशिकांत रक्ताच्या थारोळ्यात पडल्या पडल्या ताबडतोब गावकऱ्यांनी त्याला मिरज येथील मिशन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.

मिशन येथील अतिदक्षता विभागामध्ये शशिकांत खोतवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

या घटनेचा अधिक तपास कवठेमहांकाळ पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Attack on a youth in a crowd during a yatra at Vithurayachiwadi in sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.