इच्छुकांच्या गर्दीने नेत्यांची डोकेदुखी वाढली
By admin | Published: July 10, 2015 11:36 PM2015-07-10T23:36:02+5:302015-07-10T23:51:28+5:30
बाजार समिती निवडणूक : व्यापारी प्रतिनिधींच्या बिनविरोधचा फैसला १५ जुलैनंतर; ‘चेंबर’ची भूमिका महत्त्वाची
अंजर अथणीकर- सांगली -सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी प्रतिनिधीच्या दोन जागांसाठी २६ उमेदवारांनी ४६ अर्ज दाखल केल्याने व्यापाऱ्यांच्या नेत्यांपुढे यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे बिनविरोध निवडीसाठी चेंबर आॅफ कॉमर्स प्रयत्न करीत असताना, दुसरीकडे इच्छुकांची संख्या भरमसाट वाढल्याने, तडजोडीसाठी नेत्यांना कसरत करावी लागत आहे. यासाठी आता १५ जुलैनंतर उमेदवारांना एकत्रित बोलावण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.
बाजार समितीमध्ये व्यापारी प्रतिनिधीसाठी दोन जागा आहेत. यासाठी २६ जणांनी तब्बल ४६ अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी दाखल केलेल्यांनी प्रचारही सुरु केला आहे. यापूर्वीचा संपर्क असल्यामुळे व्यापाऱ्यांनी माघार न घेण्याचा आपला मनोदय व्यक्त केला आहे. उमेदवारी दाखल केलेल्यांमध्ये मार्केट यार्डमधील चेंबरचे उपाध्यक्ष नितीन पाटील, माजी अध्यक्ष अशोक पाटील, विवेक ऊर्फ बंडू शेटे, सुनील पट्टणशेट्टी, महाबळेश्वर चौगुले, शरद शहा, मुनीर जांभळीकर, शीतल पाटील, अभय मगदूम आदींसह २६ जणांचा यामध्ये समावेश आहे. या उमेदवारांनी आता व्यापाऱ्यांच्या गाठीभेटीही सुरु केल्या आहेत. यापूर्वी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवणुकीसाठी आपण केलेले प्रयत्न आदींची माहिती ते देत आहेत. यापूर्वी ही मंडळी अनेक संस्थांवर पदाधिकारी राहिली आहेत. त्यामुळे आपल्याला संधी मिळावी, असा त्यांचा दावा आहे.
यापूर्वी व्यापारी प्रतिनिधीची निवड ही अराजकीय स्वरुपाची होती. यावर्षीही व्यापारी प्रतिनिधी बिनविरोध करण्यासाठी चेंबर आॅफ कॉमर्स प्रयत्नशील आहे. १५ जुलैनंतर चेंबरचे ज्येष्ठ पदाधिकारी वैयक्तिक व्यापारी उमेदवारांच्या बैठका घेणार आहेत. व्यापाऱ्यांसाठी वेळ देणारा व त्यांनी यापूर्वी केलेल्या कामकाजाचा आढावा यावेळी घेण्यात येणार आहे. चेंबरतर्फे दोन प्रतिनिधींची शिफारस केली जाणार आहे. इच्छुकांची गर्दी वाढल्यामुळे बिनविरोधसाठी कसरत करावी लागणार आहे. यात अपयश आल्यास निवडणुका अटळ आहेत. यापारी मतदार संघामध्ये १३०६ मतदार असून, यामध्ये सर्वाधिक मतदार मार्केट यार्डमध्ये आहेत. त्यांची संख्या ९८० आहे. जत, कवठेमहांकाळ, मिरज व विष्णुअण्णा फळ मार्केटमधील मतदारांची संख्या सव्वातीनशे आहे. यामुळे मार्केट यार्ड म्हणजे चेंबर आॅफ कॉमर्सची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, चेंबर आॅफ कॉमर्सने उमेदवारी नाकारल्यास, विरोधी गटाकडून लढण्याची काहींची तयारी आहे.
व्यापारी प्रतिनिधी अराजकीय असावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे. व्यापाऱ्यांच्या समस्यांची जाण असणारे प्रतिनिधी निवडीवर भर असणार आहे. यासाठी आम्ही आता १५ जुलैनंतर सर्वच इच्छुक उमेदवारांची बैठक घेणार आहोत. व्यापारी प्रतिनिधींची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी ज्येष्ठ मंडळी व ‘चेंबर’ची संस्था प्रयत्न करणार आहे.
- मनोहर सारडा,
अध्यक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स, सांगली.
आठ संचालक रिंगणात
चेंबर आॅफ कॉमर्सचे आठ विद्यमान संचालक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये उपाध्यक्ष नितीन पाटील, शरद शहा, अशोक पाटील आदींचा समावेश आहे. चेंबरला बिनविरोध निवडीसाठी या संचालकांची मनधरणी करावी लागणार आहे. हा निर्णय आता १५ जुलैनंतरच होणार आहे.