कसबे डिग्रजमध्ये शाळकरी मुलाचा अपहरणाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:36 AM2021-06-16T04:36:58+5:302021-06-16T04:36:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कसबे डिग्रज : मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील समध मोहसीन शेख (वय १३) या शाळकरी मुलाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील समध मोहसीन शेख (वय १३) या शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न दोन युवकांनी मंगळवारी दुपारी केला. पण मुलाने चातुर्याने सुटका करून घेतली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
समध शेख (मूळ गाव घेरडी, ता. जत) पाचवीमध्ये शिकतो. त्याची आई व बहीण काही महिन्यांपासून कसबे डिग्रज येथे मजुरी करण्यासाठी आल्या आहेत. हे कुटुंब शिवाजीनगर परिसरात राहते. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास समध शेख तुकाराम मंदिर परिसरात इतर मुलांसह खेळत होता. दरम्यान मोठा पाऊस सुरू आला. त्यावेळी इतर मुले आपापल्या घरी गेली. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखींनी समधला गाठले. त्याच्या तोंडाला त्यांनी रुमाल लावला. त्याला थोडी गुंगी आल्यानंतर ते त्याला दुचाकीवरून घेऊन गेले. दोघांनी काळ्या रंगाचे कपडे घातले होते आणि तोंड रुमालाने बांधले होते.
दुचाकीस्वार मारुती मंदिरापासून एक किलोमीटरवरील नदीकाठी गेलेे; पण पुढे रस्ता नसल्याने काठावर दुचाकी लावून दोघेही रस्ता शोधू लागले. दरम्यान समधला शुद्ध आली. त्याने संधी साधून हाताला धरून उभ्या असलेल्या एका अपहरणकर्त्याच्या हाताचा जोरात चावा घेतला आणि तेथून पळ काढला. ते दोघेही त्याच्या पाठीमागे पळत होते. परंतु मारुती मंदिरजवळ आल्यानंतर तो तुकाराम मंदिराकडे असलेल्या रस्त्याने पळताना ओरडत जात होता. त्यामुळे लोक घराबाहेर आले. लोक जमा होण्याच्या भीतीपोटी ते दोन्ही अनोळखी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या रस्त्याने निघून गेले.
समधच्या अंगावरील कपडे झटापटीमध्ये घाण झाले आहेत. त्याच्या पाठीवर त्या दोन अपहरणकर्त्यांच्या नखांचे ओरखडे दिसून आले आहेत. त्या दोन अनोळखींनी मारहाण केल्याचेही त्याने सांगितले. ते दोघे कन्नडमध्ये बोलत होते. घटनेची माहिती मिळताच उपसरपंच सागर चव्हाण, प्रमोद चव्हाण, संजय शिंदे, अजित काशीद यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपसरपंच चव्हाण यांनी सांगली ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली.