बहुजन समाजाला बुद्धिहीन करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:27 AM2021-05-11T04:27:01+5:302021-05-11T04:27:01+5:30
विटा : सध्या बहुजन समाज हा मोठ्या कात्रीत सापडला आहे. शैक्षणिक धोरण आणि अवलंबलेल्या तंत्रामुळे सध्याचे वातावरण आता जातीवाचक ...
विटा : सध्या बहुजन समाज हा मोठ्या कात्रीत सापडला आहे. शैक्षणिक धोरण आणि अवलंबलेल्या तंत्रामुळे सध्याचे वातावरण आता जातीवाचक नव्हे, तर बुद्धिहीनविरुद्ध बुद्धिवान असा करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. त्यामुळे बहुजन समाजाला बुद्धिहीन करण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नाविरुद्ध शेतकरी कामगार पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी आवाज उठवून तीव्र लढा उभारावा, असे आवाहन बलवडी (भा.) येथील शेकापचे ज्येष्ठ नेते संपतराव पवार यांनी केले.
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या युवा कार्यकर्ता प्रशिक्षण व अभ्यास या ऑनलाइन राज्यस्तरीय शिबिरात 'पुरोगामी युवक संघटना काल, आज आणि उद्या' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी शेकापच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य चंद्रशेखर पाटील होते.
संपतराव पवार म्हणाले, सध्याचा काळ पाहता आजूबाजूची परिस्थिती विषण्ण करणारी आहे. कोरोनाच्या कालखंडात या परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती ही समाजात निर्माण करण्याची तीव्र गरज आहे. आज अडचणीत सापडलेल्या आणि संकटात अडकलेल्या माणसाला मदत करणे व एक पुरोगामी, कष्टकरी विचारांचा आवाज बुलंद करून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी युवकांचे फ्रंट बलशाली करण्याचा शेतकरी कामगार पक्षाचा हा उपक्रम स्वागतार्ह आहे.
चौकट :
राज्यभरात प्रतिसाद
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या युवा नेत्या चित्रलेखा पाटील व साम्य कोरडे यांच्या पुढाकाराने युवा कार्यकर्ता प्रशिक्षण व अभ्यास शिबिरांतर्गत राज्यस्तरीय ऑनलाइन व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे. या व्याख्यानाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. थेट प्रक्षेपणाचा हजारो युवकांनी लाभ घेतला.
फोटो - संपतराव पवार, बलवडी (भा.) यांचा फोटो वापरणे.