Sangli: मराठा आरक्षणासाठी तहसीलदार कक्षातच डिझेल अंगावर ओतून युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 01:29 PM2023-10-31T13:29:44+5:302023-10-31T13:30:06+5:30

प्रशासनाची तारांबळ

Attempt of self-immolation by pouring diesel on the body of Tehsildar for Maratha reservation | Sangli: मराठा आरक्षणासाठी तहसीलदार कक्षातच डिझेल अंगावर ओतून युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Sangli: मराठा आरक्षणासाठी तहसीलदार कक्षातच डिझेल अंगावर ओतून युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

विकास शहा

शिराळा:  मराठा आरक्षण हवेच , मी स्वतः भोगत आहे माझ्या पत्नीने वीस वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा दिल्या मात्र एक दोन गुणांनी तिची निवड होऊ शकली नाही कारण आम्हाला आरक्षण नाही, मग जगायचे कश्याला ? मनोज जिरंगे यांची उचललेले पाऊल योग्य आहे त्यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष देवेंद्र वसंत धस (वय ३७ , बिळाशी ) यांनी तहसीलदार यांच्या कक्षात कार्यालयीन वेळेपूर्वीच डिझेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली मात्र तहसीलदार शामला खोत पाटील यांनी एकट्या त्यांच्या कक्षामध्ये जाऊन म्हणणे ऐकून घेऊन समजूत काढली यानंतर धस यांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली.

सकाळी ८:४५ वाजता धस हे तहसीलदार कार्यालयात आले तेथून त्यांनी काही अधिकाऱ्यांना फोन लावले. ९:१५ वाजता त्यांनी तहसीलदार कक्षात प्रवेश केला व त्यांनी दरवाजा आतून कडी नसल्याने खुर्च्या लावून बंद केला. कार्यालय सुरू होण्यापूर्वीच ही घटना घडली त्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. घटनेची माहिती सर्वत्र पसरताच कार्यालयाजवळ पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंगराव पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य अजय जाधव, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सत्यजित कदम, विनोद कदम आले. दरवाजा बंद असल्याने त्यांनी खिडकीतून देवेंद्र यांना समजावण्याचा प्रयत्न केला. 

तहसीलदार शामला खोत पाटील कार्यालयात आल्यानंतर त्यांनीही देवेंद्र यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देवेंद्र यांनी तहसीलदार यांनी माझ्या व्यथा समजून घ्याव्यात अशी भूमिका घेतली. तहसीलदार कक्षात कोणतीही पर्वा न करता तहसीलदार खोत या गेल्या.यावेळी बाहेर उपस्थित अधिकारी, पोलीस यंत्रणा, नागरिक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. कारण तहसीलदार एकट्याच आत! यादरम्यान पोलिसांनी अग्निशमन यंत्रणा, घोंगडे आदी आग विझविण्यासाठीची यंत्रणा सज्ज केली. अखेर २० मिनिटे समजावून सांगितले नंतर कक्षाचा दरवाजा उघडण्यात आला यावेळी सर्व उपस्थितांनी निश्वास टाकला.

यावेळी देवेंद्र यांनी मी आरक्षण नसल्याने काय होते आहे हे भोगतो आहे , मला व कुटुंबाला जगणे अवघड झाले आहे. माझी  पत्नी गौरी हिने  वीस वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा दिल्या मात्र एक दोन गुणांनी तिची निवड होऊ शकली नाही कारण आम्हाला आरक्षण नाही, मग जगायचे कश्याला ? मनोज जिरंगे यांची उचललेले पाऊल योग्य आहे त्यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे.मोठमोठे नेतेमंडळी दाखले घेऊन बसले आहेत त्यांना आमच्या सामान्य मराठी जनतेशी काही देणे घेणे नाही.    तहसीलदार कार्यालयासमोर मंडप टाकून देवेंद्र यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली. तर माझ्यामुळे आपणा सर्वांना त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

नेतेमंडळींनी कुणबी दाखले मिळवून फायदा घेतला

आपण आज येताना आईच्या पायापडूनच आलो आहे. मी आरक्षणासाठी आत्मदहन करणार असे सांगूनच ! आम्ही किती यातना सोसायच्या ? आज माझी परिस्थिती बेताचीच आहे .या तालुक्यातील अनेक अधिकारी , नेतेमंडळी यांनी कुणबी दाखले मिळवून फायदा घेतला आहे आम्ही सर्वमान्यांनाच याच्या यातना सोसाव्या लागत आहेत ही आमच्या मराठा समाजाची शोकांतिका आहे.

Web Title: Attempt of self-immolation by pouring diesel on the body of Tehsildar for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.