मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचा शेततळ्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:49 IST2019-05-20T23:47:36+5:302019-05-20T23:49:22+5:30
शेततळ्यात पोहताना बुडणाऱ्या १३ वर्षाच्या स्वत:च्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात अर्चना अर्जुन हिंगे (वय ४५, रा. बलवडी-खा.) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना

मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचा शेततळ्यात बुडून मृत्यू
विटा/खानापूर : शेततळ्यात पोहताना बुडणाऱ्या १३ वर्षाच्या स्वत:च्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात अर्चना अर्जुन हिंगे (वय ४५, रा. बलवडी-खा.) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील बलवडी (खा.) येथे सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. यावेळी शेततळ्याच्या पाण्यात बुडत असलेला हर्षद अर्जुन हिंगे (१३) हा स्थानिक लोकांच्या प्रसंगावधानाने बचावला.
बलवडी (खा.) येथील अर्चना हिंगे गावाजवळच्या चव्हाण मळा (शंभूखडी) येथे शेतात राहत होत्या. त्यांच्या घराजवळच मोठे शेततळे आहे. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हर्षद हा त्यांचा १३ वर्षाचा मुलगा पोहण्यासाठी शेततळ्यात उतरला. परंतु, पाणी जास्त असल्याने तो पाण्यात बुडू लागला. हा प्रकार त्याची आई अर्चना यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पाण्यात बुडत असलेल्या हर्षद यास वाचविण्यासाठी शेततळ्यात उडी मारली.
परंतु, त्यांनाही पोहता येत नसल्याने त्या पाण्यात बुडू लागल्या. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावले. अर्चना व हर्षद दोघांनाही पाण्याबाहेर काढण्यात आले. दोघांनाही खानापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच अर्चना यांचा मृत्यू झाला होता, तर हर्षद बचावला.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद विटा पोलिसांत असून उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे तपास करीत आहेत.
मुलीची आरडाओरड
त्यावेळी शेततळ्याजवळ असलेल्या अर्चना यांच्या मुलीने आरडाओरडा केल्यानंतर शेतात असलेल्या स्थानिक लोकांनी शेततळ्याकडे धाव घेतली. लोकांनी प्रसंगावधान राखून शेततळ्याच्या पाण्यातून अर्चना व हर्षद यांना बाहेर काढले. अर्चना यांच्या नाका-तोंडात पाणी गेले होते.