हनुमान चालीसा आणि भोंग्यावरून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 01:24 PM2022-04-27T13:24:38+5:302022-04-27T13:25:11+5:30
त्यांचा या मागील हेतू काय? हे सुज्ञ जनतेने ओळखले असून त्यांचा हा डाव राज्यातील जनताच उधळून लावेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
इस्लामपूर : हनुमान चालीसा आणि भोंग्यांची भाषा करून समाजात तेढ निर्माण करण्याचा उद्योग काही मंडळी करीत आहेत असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नामोल्लेख टाळून मनसे आणि भाजपला लगावला. मात्र त्यांचा या मागील हेतू काय? हे सुज्ञ जनतेने ओळखले असून त्यांचा हा डाव राज्यातील जनताच उधळून लावेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
येथील ख्वाजा गरीब नवाज सोशल ट्रस्टच्यावतीने मोमीन मोहल्ला येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस ऍड. चिमण डांगे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, ओबीसी सेलचे राष्ट्रीय सहसचिव अबीद मोमीन, महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर, युवक शहराध्यक्ष सचिन कोळी, माजी नगरसेवक पिरअली पुणेकर आदी. उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, आपण वर्तमान पत्र व टी.व्ही.चॅनेलवरून राज्यातील राजकीय, सामाजिक वातावरण वाचत असाल, पहात असाल. काही मंडळी हनुमान चालीसा आणि भोंग्यांची भाषा करीत आहेत. या मंडळींचा हेतू शुद्ध नाही. त्यांना यातून समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजायची आहे हे स्पष्ट आहे. मात्र राज्यातील सुज्ञ जनता या मंडळींचा हा डाव हाणून पडतील. ज्यांची केंद्रात सत्ता आहे, आणि जे राज्यात सत्ता घेण्यासाठी अस्वस्थ आहेत, ती मंडळी राज्यास बदनाम करून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहेत. यावेळी त्यांनी येणाऱ्या रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.