'खासगी बसेस घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न, ४० हजार एकरवर गृहविभागाचा डोळा'

By अशोक डोंबाळे | Published: January 17, 2023 03:42 PM2023-01-17T15:42:28+5:302023-01-17T15:43:25+5:30

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन करून आंदोलन भडकविले

Attempt to force ST employees to leave the country by taking private buses, Target of Home Department at 40 thousand acres | 'खासगी बसेस घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न, ४० हजार एकरवर गृहविभागाचा डोळा'

संग्रहीत फोटो

Next

सांगली : राज्यातील एसटी महामंडळ खासगी शिवशाही बसेसमुळे तोट्यात गेले असताना राज्य सरकार १८९५० खासगी बसेस घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे व सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी मंगळवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली. राज्यातील एसटीच्या ४० हजार एकर जागांवर गृहविभागाचा डोळा असून त्यामुळे एसटीचे मोठे नुकसान होणार आहे, असेही ते म्हणाले.

शिंदे, ताटे म्हणाले की, शिवशाही बसेसमुळे लालपरी आर्थिक संकटात आली असतानाही त्याकडे राज्य शासनाने गांभीऱ्याने लक्ष दिले नाही. या प्रश्नांवर गांभीऱ्याने विचार करण्याऐवजी राज्य शासनाने पुन्हा १८ हजार ९५० खासगी बसेस चालक व वाहकांसह एसटी महामंडळाच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यापैकी पहिल्या वर्षी ९५०, दुसऱ्या वर्षी २५००, तिसऱ्या वर्षी ३५००, चौथ्या वर्षी ५००० आणि पाचव्या वर्षी ७००० असे एकूण १८९५० बसेस राज्य सरकार घेणार आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळातील लालपरीचे अस्तित्वच संपणार आहे. एसटीचे खासगीकरण करण्याचे हे मोठे षडयंत्र आहे. या प्रश्नावर कर्मचाऱ्यांबरोबर जनतेनही आवाज उठविण्याची गरज आहे. 

एसटी बसेसचे खासगीकरण होत असतानाच दुसऱ्या बाजूला एसटीच्या मोकळ्या जागांवर सरकारचा डोळा आहे. एसटीच्या मोकळ्या जागा आमचा दागिना आहे. पूर्वीपासून या जागा सांभाळण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी बसस्थानक उभारले त्याच ठिकाणी शहर, गावे वसली आहेत. बीएसएनएल, एमटीएनएल, एलआयसीबद्दल जे झाले ते एसटीबद्दल घडू नये; अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत, सरचिटणीस नारायण सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

सातवा वेतन आयोग लागू करा

राज्य शासनाने काही महामंडळ व काही संस्थांना सातवा वेतन आयोग लागू केला. मात्र एसटी कामगारांना सातव्या वेतन आयोगापासून वंचित ठेवलेले आहे, हे अन्यायकारक आहे. म्हणून दि. १ एप्रिल २०१६ पासून एसटी कामगारांना सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग लागू करावा. त्यासाठी संघटना १० वर्षांची मुदत मान्य करण्यास तयार आहे, असेही शिंदे व ताटे म्हणाले.

सदावर्ते यांच्यामुळे एसटी तोट्यात

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन करून आंदोलन भडकविले. एसटीचा विचार करून वेळीच आंदोलन थांबविले असते तर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडविता आली असती. पण, त्याकडे दुर्लक्ष करून सदावर्ते यांनी आंदोलन चालूच ठेवले. यामुळे एसटीकडे प्रवासी कमी झाल्यामुळे एसटी तोट्यात गेलीच. पण, त्यापेक्षाही प्रत्येक कर्मचाऱ्याचे दोन ते चार लाख रुपयापर्यंत नुकसान झाले, अशी टीकाही संदीप शिंदे यांनी केली.

Web Title: Attempt to force ST employees to leave the country by taking private buses, Target of Home Department at 40 thousand acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.