इस्लामपुरात होमगार्डवर फरार संशयिताकडून हल्ल्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:26 AM2021-05-10T04:26:34+5:302021-05-10T04:26:34+5:30
इस्लामपूर : येथील इस्लामपूर न्यायालयाच्या परिसरात चोरीच्या प्रयत्नातील संशयितास पकडण्यासाठी आलेल्या कासेगावच्या पोलीस पथकातील गृहरक्षक दलाच्या जवानावर हल्ला करत ...
इस्लामपूर : येथील इस्लामपूर न्यायालयाच्या परिसरात चोरीच्या प्रयत्नातील संशयितास पकडण्यासाठी आलेल्या कासेगावच्या पोलीस पथकातील गृहरक्षक दलाच्या जवानावर हल्ला करत त्याच्या बोटाला चावा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास पथकाने जेरबंद केले. चोरीच्या उद्देशाने शस्त्रे जवळ बाळगून संशयास्पद रीतीने फिरणाऱ्या टोळीतील चौघांना कासेगाव पोलिसांनी अटक केली होती. मात्र, एकजण फरार झाला होता.
दिग्विजय महादेव सावंत (वय २५) या पथकातील जखमी जवानाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामचंद्र आनंदा वडार ऊर्फ बापू पवार असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तो इस्लामपूर न्यायालय आवारात पोलिसांनी अटक केलेल्या चार साथीदारांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती कासेगाव पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पथकाने येथील न्यायालय आवारात सापळा लावला होता.
संशयित रामचंद्र वडार सकाळी साडेअकराच्या सुमारास दुचाकी (एमएच १० एझेड ४६०७) वरून मणिकंडण हॉटेलजवळ आला होता. तेथून तो न्यायालयाच्या दिशेने येत असताना पथकाने त्याला हटकले. त्यावेळी संशयित वडार याने पथकाशी झटापट करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिग्विजय सावंत यांनी त्याला पाठीमागून पकडले. त्यावेळी वडार याने त्यांच्या बोटाला चावा घेऊन पलायन करत असताना पथकाने त्याला ताब्यात घेतले.