पूर्ववैमनस्यातून सशस्त्र हल्ला करत एकाच्या खुनाचा प्रयत्न, इस्लामपुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 12:50 PM2022-09-17T12:50:16+5:302022-09-17T12:50:41+5:30

यातील तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

Attempted murder of one by armed assault with prior animosity in islampur | पूर्ववैमनस्यातून सशस्त्र हल्ला करत एकाच्या खुनाचा प्रयत्न, इस्लामपुरातील घटना

पूर्ववैमनस्यातून सशस्त्र हल्ला करत एकाच्या खुनाचा प्रयत्न, इस्लामपुरातील घटना

Next

इस्लामपूर : शहरातील बहे नाका परिसरातील बेघर वसाहतीमधील एकावर चौघांच्या टोळक्याने पूर्ववैमनस्यातून तलवार, कोयता आणि लोखंडी गजाने हल्ला चढवत त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास घडला. यातील तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत जखमी नवनाथ भीमराव कांबळे (वय २५, रा. बहे नाका, बेघर वसाहत) याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयवंत ऊर्फ आबा रघुनाथ शिंदे (वय २२), उद्धव रघुनाथ शिंदे (२०, दोघे रा. माळगल्ली), रोहित सुरेश जाधव (२८) आणि स्वप्निल ऊर्फ डी. जे. (दोघे रा. जावडेकर चौक, इस्लामपूर) अशा चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील स्वप्निल डी. जे. हा पसार झाला असून इतर तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. येथील न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या खुनी हल्ल्याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या चौघा हल्लेखोरांनी नवनाथ कांबळे याचा मित्र संकेत जाधव याला मारहाण केली होती. त्याचा जाब कांबळे याने विचारला होता. हा राग मनात धरून गुरुवारी सायंकाळी बेघर वसाहतीमधील अर्धवट बांधकाम असलेल्या इमारतीमधील कांबळे याला गाठून या चौघांनी त्याच्यावर सशस्त्र हल्ला चढविला. तलवार आणि कोयत्याने कांबळे याच्या डोक्यात वार करून लोखंडी गजाने पायावर जबर मारहाण करत त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या खुनी हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नवनाथ कांबळे याला उपचारासाठी पाठविले. तसेच पळून गेलेल्या चौघांपैकी तिघा संशयितांना शिताफीने ताब्यात घेण्याची कारवाई केली. सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Attempted murder of one by armed assault with prior animosity in islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.