पोलीस उपअधीक्षकांना फोन करून युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:24 AM2021-03-19T04:24:44+5:302021-03-19T04:24:44+5:30
इस्लामपूर : कुटुंबातून सुरुवातीला विरोध आणि नंतर होकार मिळाला; मात्र त्याने धोका दिल्याने प्रेमभंग झाल्याच्या उद्विग्नतेतून शिराळा तालुक्यातील युवतीने ...
इस्लामपूर : कुटुंबातून सुरुवातीला विरोध आणि नंतर होकार मिळाला; मात्र त्याने धोका दिल्याने प्रेमभंग झाल्याच्या उद्विग्नतेतून शिराळा तालुक्यातील युवतीने थेट पोलीस उपअधीक्षकांना फोन लावत हाताच्या शिरा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला, तसेच या घटनेला त्याला जबाबदार धरा, असेही फोनवर सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांच्या निर्भया पथकाने दत्त टेकडी परिसरात धाव घेत या युवतीला रुग्णालयात दाखल करून तिचे प्राण वाचवले. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली.
शिराळा तालुक्यातील ही युवती इस्लामपूर शहरात पदवीचे शिक्षण घेण्यासाठी येत होती. सोलापूर जिल्ह्यातील युवकाशी तिचे प्रेमसंबंध जुळले होते. सुरुवातीला युवतीच्या घरातून याला विरोध झाला. त्यानंतर काही काळाने होकार मिळाला; मात्र तोपर्यंत दोघांच्या प्रेमात दुरावा निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी या युवतीने येथील पोलीस उप-अधीक्षक कृष्णात पिंगळे यांची भेट घेऊन याची माहिती दिली. त्यांनी शैक्षणिक प्रगतीवर लक्ष देण्याचा सल्ला तिला दिला; मात्र बुधवारी सकाळी या युवतीने कामेरी रस्त्यावरील दत्त टेकडीवर आपल्या दोन्ही हातांच्या मनगटाजवळ कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी निर्भया पथकाला तातडीने धाडले. पथकातील हवालदार संपत वारके, महिला पोलीस अक्काताई नलवडे, उषा पाटील व इतरांनी या युवतीला खासगी रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे तिच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. त्यामुळे तिला जीवनदान मिळाले.