विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न

By admin | Published: April 8, 2016 11:33 PM2016-04-08T23:33:47+5:302016-04-09T00:05:26+5:30

सदाभाऊ खोत : इस्लामपृूरचा विकास आराखडा रद्द होणार

Attempts to build opponents | विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न

विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न

Next

अशोक पाटील -- इस्लामपूर -आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादीच्या विरोधात विरोधी आघाडीची मोट बांधण्याच्या हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. इस्लामपूर शहराचा विकास आराखडा रद्द करण्याचे विरोधकांचे प्रयत्न यशस्वी होतील आणि आराखडा रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इस्लामपुरात मेळावा घेणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
पालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी पक्ष स्वत:चा गट मजबूत करण्याच्या तयारीला लागला आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्यासाठी गल्लीबोळातील युवा नेतेही ताकद दाखवत आहेत. विरोधी गटात खमक्या नेता नसल्याने त्यांच्यामध्ये अजूनही ताळमेळ नाही. त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. नियोजित विकास आराखड्याबाबत विरोधकांतच एकमत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्वत: शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करुन, अन्यायी विकास आराखडा रद्द करण्याची मागणी केली. त्याला यश येण्याचे स्पष्ट संकेत खोत यांनी दिले.
खोत म्हणाले की, पालिका निवडणुकीत विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न करणार आहोत. विरोधी गटात सुशिक्षित युवकांना जास्तीत जास्त संधी देऊन नवी पिढी राजकारणात उतरविण्याची तयारी सुरू आहे. यासाठी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, जयकर पाटील, विजय कुंभार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल महाडिक, महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक, कपिल ओसवाल, अमित ओसवाल, सतीश महाडिक, शिवसेनेचे आनंदराव पवार यांच्यासह राष्ट्रवादीविरोधात सक्रिय असलेल्या सर्व संघटनांना हाताशी धरुन चांगला पर्याय तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
इस्लामपूर शहरातील गुंडगिरी संपविण्यासाठी खमक्या अधिकाऱ्याची गरज होती. पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्यारूपाने ती पूर्ण झाली आहे. परंतु सत्ताधारी राष्ट्रवादीसह विरोधी गटातील पदाधिकारी त्यांच्यावर दबाव आणत आहेत. त्यामुळे त्यांना कारवाई करताना अडचणी येत आहेत. आगामी पालिका निवडणूक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संघर्षाची करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊनच लढा देण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचेही खोत यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण भागातील टॅलेंटवर पुन्हा एकदा मोहोर
पालिकेच्या मागील निवडणुकीत विरोधकांना खासदार शेट्टी आणि खोत यांनी मदतीचा हात पुढे केला होता. आता मात्र हे दोघे पुढे येऊन विरोधकांची मोट बांधणार आहेत. त्याला शहरातील विरोधी युवा नेते कितपत सहकार्य करणार, यावरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. ऐन दुष्काळातही खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांनी स्वत:चा वाढदिवस इस्लामपुरातील मोठ्या हॉटेलमध्ये साजरा केला, शहरात डिजीटल फलक उभे केले. यावरून खोत यांच्या मुलालाही पालिका निवडणुकीचे वेध लागल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: Attempts to build opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.