बिबट्या आणि ग्रामस्थांत सुसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:40 AM2020-12-16T04:40:30+5:302020-12-16T04:40:30+5:30
मोहित्यांचे वडगाव येथे वन विभाग व नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीतर्फे बिबट्याबाबत जागृतीसाठी ग्रामस्थांना मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. लोकमत न्यूज नेटवर्क ...
मोहित्यांचे वडगाव येथे वन विभाग व नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीतर्फे बिबट्याबाबत जागृतीसाठी ग्रामस्थांना मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सागरेश्वर अभयारण्यात बिबट्या आढळल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने पंचक्रोशीत जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत प्राणी अभ्यासकांच्या मदतीने गावोगावी ग्रामस्थांना बिबट्याचा वावर, सुरक्षितता आदींविषयी माहिती दिली जाणार आहे.
वन क्षेत्रपाल ए. एन. करे यांनी सांंगितले की, बिबट्याच्या आगमनाने परिसरातील ग्रामस्थांत भीती निर्माण झाली आहे. ती नाहीशी व्हावी, बिबट्या व ग्रामस्थ या दोहोंची सुरक्षितता राखली जावी, यासाठी जागृती मोहीम सुरू केली आहे. यासाठी वन विभागाने नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीच्या कार्यकर्त्यांची मदत घेतली आहे. सोसायटीचे डॉ. हर्षद दिवेकर, अमोल जाधव, तबरेज खान यांनी देवराष्ट्रे व मोहित्यांचे वडगाव येथे सोमवारी मोहिमेचा प्रारंभ केला. मंगळवारी आसद व कुंभारगावमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांनी बिबट्या व मानवी सहजीवन याविषयी माहिती दिली. ग्रामस्थांच्या मनातील भीती बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात यशस्वी झाल्याचे डॉ. दिवेकर म्हणाले. सागरेश्वर अभयारण्यात बिबट्याचे आगमन होणे, ही निसर्गाचे संतुलन साधणारी बाब ठरल्याचेही ते म्हणाले.
चौकट
कुंडल, दह्यारी, ताकारीमध्येही कार्यशाळा
बुधवारी कुंडल व घोगावमध्ये, गुरुवारी दह्यारी व दुधारीत आणि शुक्रवारी ताकारी व तुपारी येथे बिबट्याविषयी जागृती कार्यशाळा घेण्यात येणार आहे. याद्वारे बिबट्या व ग्रामस्थांत सुसंवाद निर्माण करण्याचा वन विभाग व प्राणीमित्रांचा प्रयत्न आहे.
-------------------------