पुराच्या पाण्यातून दुचाकी नेण्याचा प्रयत्न नडला, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 11:24 AM2019-10-10T11:24:32+5:302019-10-10T11:25:09+5:30
कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव येथील अग्रणी नदीला पूर आला असून, आज सकाळी एक दुचाकी वाहून गेली आहे. या आठवड्यात दोनवेळेला अग्रणी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे.
सांगली - कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव येथील अग्रणी नदीला पूर आला असून, आज सकाळी एक दुचाकी वाहून गेली आहे. या आठवड्यात दोनवेळेला अग्रणी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. २५ वर्षांनंतर अग्रणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
गेल्या आठवड्याभरापासून तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. हिंगणगाव येथील अग्रणी नदी कायम कोरडी असते. मात्र या आठवड्यात सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने अग्रणी नदीतून पाणी वाहू लागले. मागील आठवड्यात अग्रणी नदीला पूर आला होता. यावेळी मोरगाव येथील दोघेजण वाहून गेले होते. ते दोन दिवसांनंतर मयत अवस्थेत सापडले. बुधवारी पहाटे तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे महसूल प्रशासनाने बुधवारी पावसाचा अंदाज घेऊन अग्रणी नदी धोक्याची पातळी ओलांडणार असल्याचे सोशल मीडियावरून नागरिकांना सावध केले होते.
गुरुवारी पहाटेपासूनच अग्रणी नदीच्या पुलावरून पाहणी वाहू लागले. पाण्याने धोक्याची पातळी पार केली. पोलीस प्रशासनाने ही वाहतूक बंद केली, तरीही हिंगणगाव येथील प्रशांत पाटील हा दुचाकीस्वार पूल पार करत होता. पाण्याचा वेग प्रचंड होता. त्यामुळे त्याची गाडी वाहून गेली. त्याने दुचाकी सोडल्याने तो वाचला. दुपारपर्यंत पाणी ओसरले नव्हते. कवठेमहांकाळला शाळेला, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी हिंगणगाव येथूनच घरी माघारी परतले.