काँग्रेस, सेना-भाजप युतीच्या जागावाटपाकडे लक्ष
By admin | Published: July 7, 2015 11:34 PM2015-07-07T23:34:56+5:302015-07-07T23:34:56+5:30
विटा बाजार समिती निवडणूक : महायुतीचीही नजर; दोन दिवसात जागावाटपाबाबत बैठक
दिलीप मोहिते - विटा -खानापूर व कडेगाव तालुका कार्यक्षेत्र असलेल्या विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे धूमशान सुरू झाले आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप व कॉँग्रेसने युती केली असून त्यांच्या जागावाटपाकडे दोन्ही तालुक्यांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया दि. १४ जुलैपर्यंत असल्याने येत्या दोन-तीन दिवसात जागावाटपाबाबत युतीची बैठक होण्याचे संकेत आहेत.
बाजार समितीच्या १९ जागांसाठी ११६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीने जुनी शिवसेना, भाजप, रिपाइं, समतावादी पक्ष, शेतकरी संघटना यांना सोबत घेऊन महायुती केली आहे. या महायुतीचे नेतृत्व राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांच्याकडे आहे. कोणत्याही परिस्थितीत महायुतीची सत्ता आणण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.
दुसरीकडे आमदार अनिल बाबर यांची शिवसेना, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा भाजप व ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांच्या कॉँग्रेसची युती झाली आहे. या युतीत कडेगाव व खानापूर तालुक्याला किती जागा द्यायच्या, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या तीनही नेत्यांची येत्या दोन-चार दिवसात विट्यात बैठक होणार आहे. या बैठकीत कडेगावला १९ पैकी १० जागा मागणार असल्याचे मोहनराव कदम यांनी सांगितले आहे. मात्र कडेगावला दहा जागा दिल्यास त्यातील पाच जागा देशमुख यांना द्याव्या लागणार आहेत.
अनिल बाबर यांनी खानापूर तालुक्याला नऊ जागांची तयारी दर्शविल्यास ते सभापती पदावर खानापूरचा हक्क अबाधित ठेवतील, असेही सांगितले जात आहे. १९ पैकी १० जागा घेणाऱ्या कडेगावातील नेते सभापती पदासाठी दोन ते अडीच वर्षाचा कार्यकाल ठरवतील, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. सभापती पदावर लक्ष ठेवूनच जागा वाटप निश्चित होणार आहे. म्हणूनच काँग्रेस, शिवसेना, भाजप युतीमधील नेत्यांनी दोन दिवसात बैठक आयोजित केली आहे. यामध्येच जागा वाटपाचा तोडगा निघण्याची शक्यता आहे.
विरोधी महायुतीनेही युतीच्या जाग वाटप प्रक्रियेवर बारीक नजर ठेवली आहे.
इच्छुकांकडून नेत्यांची मनधरणी
इच्छुकांनी, उमेदवारीसाठी युतीच्या नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. त्यात नवीन चेहऱ्यांसह आजी-माजी संचालकांचाही समावेश आहे. शिवसेनेच्या जुन्या गटातील उमेदवारी दाखल केलेल्या काही उमेदवारांनी आ. बाबर यांच्याशी जुळवून घेण्याचे ठरविले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे महायुतीने सहभागी करून घेतलेले जुनी शिवसेना, भाजपचे उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत कोणती भूमिका स्वीकारतात, याकडेही दोन्ही तालुक्यांच्या नजरा लागल्या आहेत.