आबांचे स्मारक सांगलीत होणार

By admin | Published: April 22, 2016 12:18 AM2016-04-22T00:18:24+5:302016-04-22T00:43:03+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा कंदील : महात्मा गांधी वसतिगृहाच्या जागेला पसंती

Aub's memorial will be in Sangli | आबांचे स्मारक सांगलीत होणार

आबांचे स्मारक सांगलीत होणार

Next

सांगली : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या स्मारकासाठी सांगलीच्या महात्मा गांधी वसतिगृहाच्या जागेची गुरुवारी आ. सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व अन्य अधिकाऱ्यांनी पाहणी केली. येथे दीड एकर जागा उपलब्ध असल्याने याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. त्यांनी या जागेवर स्मारक करण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे.
सांगली-मिरज रस्त्यावर असलेल्या महात्मा गांधी वसतिगृहातच आर. आर. पाटील विद्यार्थी दशेत आणि जिल्हा परिषद सदस्य असताना राहत होते. त्यामुळे येथेच त्यांचे स्मारक होणे उचित असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी सांगितले होते. गुरुवारी दुपारी या जागेची पाहणी करण्यात आली. वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी या जागेवरील प्राथमिक आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना दाखविला. अडीच एकरमध्ये वसलेल्या या वसतिगृहाची दीड एकर जागा शिल्लक आहे. यामध्ये स्मारक होऊ शकते, असे मत त्यांनी मांडले. जागेबाबत गायकवाड यांनी हिरवा कंदील दर्शविला. तातडीने याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने ज्यापद्धतीने तेथील इमारतीचा आराखडा केला आहे, त्यापद्धतीने काम व्हावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
सर्वांनी वसतिगृहाच्या इमारतीची पाहणी केली. आबा ज्या खोलीत राहत होते, त्या खोलीची पाहणीही जिल्हाधिकारी व आ. पाटील यांनी केली. खोलीच्या बाहेर तातडीने आबांच्या नावाचा उल्लेख असणारा फलक लावण्याची सूचना गायकवाड यांनी केली. स्मारक करताना वसतिगृहाच्या इमारतीचे नूतनीकरण व अत्याधुनिक सुविधा देण्याचा निर्णयही घेण्यात आला. पाच कोटी रुपयांचा प्राथमिक प्रस्ताव सादर करून त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या योजना शिंदे, हणमंतराव देसाई, पी. एल. कांबळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

समस्यांचा पाढा
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर समस्यांचा पाढा वाचला. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी गढूळ पाण्याची बाटली दाखविली. जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने याप्रकरणी लक्ष घालून दोन दिवसांत स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याची, तसेच याठिकाणी फिल्टर बसविण्याची सूचना केली. वसतिगृहातील अस्वच्छता, विद्युत दिव्यांची गैरसोय, खोल्यांमधील सुविधा, इमारतींची दुरुस्ती अशा सर्व समस्या मांडल्या.यावेळी गायकवाड म्हणाले, वसतिगृहात नव्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

Web Title: Aub's memorial will be in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.