संख अप्पर तहसील कार्यालयात मंगळवारी २८ वाहनांचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:25 AM2021-03-18T04:25:19+5:302021-03-18T04:25:19+5:30
संख : अवैध गौणखनिज वाहतूक करीत असताना जप्त केलेल्या २८ वाहनांचा जाहीर लिलाव संख (ता. जत) अप्पर तहसील कार्यालयात ...
संख : अवैध गौणखनिज वाहतूक करीत असताना जप्त केलेल्या २८ वाहनांचा जाहीर लिलाव संख (ता. जत) अप्पर तहसील कार्यालयात दि. २२ मार्च सकाळी ११ वाजता होणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांनी दिली आहे.
अनाधिकृत गौण खनिज वाहतूक प्रकरणात जप्त करण्यात आलेली वाहने अप्पर तहसील कार्यालय संख व उमदी पोलीस ठाण्याचे आवारात लावले आहेत. जप्त वाहने सोडविण्याबाबत वारंवार कळवूनही दंडाची रक्कम शासनाला जमा केलेली नाही. अवैध वाहतूक करताना वाहन जागेवर सोडून गेलेले आहेत. दंडात्मक रक्कम भरण्यास आलेले नाहीत.
वाहनाचे मालक आढळून आले नाहीत. जी वाहने विना क्रमांकाची आहेत अशा वाहनांचा स्क्रॅप म्हणून लिलाव करण्यात येईल. लिलाव मंजूर झालेल्या व्यक्तीने उच्चतम बोलीच्या आधारे होणारी रक्कम लिलाव झालेल्या त्याच दिवशी २५ टक्के रक्कम व उर्वरित ७५ टक्के रक्कम तीन दिवसांत चलनाद्वारे शासकीय खजिन्यात जमा करावयाची आहे.
लिलावात बोली बोलण्यापुर्वी पाच हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागेल. त्याशिवाय लिलावामध्ये भाग घेता येणार नाही. सर्वाधिक बोलीच्या २५ टक्के रक्कम किंवा संपूर्ण रक्कम बोली मंजूर झाल्यावर त्याच दिवशी चलनाद्वारे भरावी लागेल. रक्कम न भरल्यास अनामत रक्कम जप्त करण्यात येईल.
वाहन ताब्यात मिळाल्यानंतर वाहन स्वतःच्या नावावर करण्याची जबाबदारी लिलावधारकाची राहील. त्यासाठी आर.टी.ओ. संदर्भात खर्च लिलावधारकाने करणे बंधनकारक राहील.
लिलावधारकाकडून कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास लिलावधारकावर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली.