पोलीस ठाण्यांतील बेवारस वाहनांचा होणार लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:43 AM2021-05-05T04:43:16+5:302021-05-05T04:43:16+5:30
सांगली : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्ह्यांखाली जप्त केेलेल्या मात्र, सध्या बेवारस असलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. ...
सांगली : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्ह्यांखाली जप्त केेलेल्या मात्र, सध्या बेवारस असलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. पोलीस दलाच्या वतीने १७ मे रोजी ३११ वाहनांचा लिलाव होणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
लिलाव प्रक्रियेबाबत माहिती देताना अधीक्षक गेडाम यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये बऱ्याच वर्षांपासून बेवारस वाहने पडून आहेत. यातील संंबंधित वाहन मालकांनी ठाण्यात ओळख पटवून आपली वाहने घेऊन जावी असे आवाहन करण्यात आले आहे, तर उर्वरित सर्व वाहने स्क्रॅपमध्ये काढण्यात येणार आहेत. पाेलीस अधीक्षक कार्यालयात सोमवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता ही प्रक्रिया होणार आहे. ही सर्व वाहने आहे त्या स्थितीत केवळ भंगार म्हणूनच दिली जाणार आहेत. यातील कोणतेही वाहन रस्त्यावर चालविणार नाही असे प्रतिज्ञापत्र लिलावातून खरेदी करणाऱ्याने द्यावयाचे आहे. या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या लिलाव प्रक्रियेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून पाेलीस ठाण्यांच्या आवारात पडून असलेली अडगळ निघणार असल्याने पोलीस ठाणे आवारही चकाचक होणार आहे.
चौकट
जिल्ह्यात ३११ वाहने
बेवारस स्थितीत असलेल्या ३११ वाहनांचा लिलाव होणार आहे. यात २८६ दुचाकी, १३ तीनचाकी, ११ चारचाकी, १ सहाचाकी अशा ३११ वाहने भंगारात काढली जाणार आहेत.